लाडक्या बहिणींची मुख्यमंत्र्यांना विशेष भेटवस्तू, श्रीकांत शिंदे यांचा धुळ्यात शेतात काम करणाऱ्या महिलांशी संवाद, पाहा VIDEO

| Updated on: Aug 29, 2024 | 8:38 PM

“आमच्या लाडक्या भावाने आम्हाला दरमहा दीड हजार रुपयांची भेट दिली आहे, त्यामुळे आमच्याकडून देखील त्यांना एक भेट द्यायची आहे”, असे सांगत महिलांनी श्रीकांत शिंदे यांच्याकडे भेटवस्तू दिली.

लाडक्या बहिणींची मुख्यमंत्र्यांना विशेष भेटवस्तू, श्रीकांत शिंदे यांचा धुळ्यात शेतात काम करणाऱ्या महिलांशी संवाद, पाहा VIDEO
श्रीकांत शिंदे यांचा शेतात काम करणाऱ्या महिलांशी संवाद
Follow us on

शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. श्रीकांत शिंदे आज जळगाव येथून धुळे येथे जात असताना त्यांनी वाटेतील शेतात काम करणाऱ्या महिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला. सर्व महिलांनी राज्यात राबवत असलेल्या लाडकी बहीण योजनेचे भरभरून कौतुक करत, या योजनेमुळे आम्हाला एक भक्कम आर्थिक आधार मिळाला आहे, असं सांगितलं. आम्ही सर्व महिला-भगिनी मिळून मुख्यमंत्री शिंदे यांची ताकद वाढवू, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

“आमच्या लाडक्या भावाने आम्हाला दरमहा दीड हजार रुपयांची भेट दिली आहे, त्यामुळे आमच्याकडून देखील त्यांना एक भेट द्यायची आहे”, असे सांगत शेतातील चवळीच्या शेंगा महिलांनी प्रेमरुपी भेट दिल्या. यावेळी खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सर्व महिलांचे आभार मानले. ‘तुम्ही आमच्या पाठीशी असेच ठामपणे उभे रहा’ असे सांगून महायुती सरकार तुमच्यासाठी अशाच कल्याणकारी योजना राबवेल, असे आश्वासन देखील दिले.

पाहा व्हिडीओ:

श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी आज जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. प्रत्येक योजनेमध्ये लाडकी बहीण आणण्याचे काम विरोधक साध्य करत आहेत. लाडकी बहीण योजनेची विरोधकांनी धस्की घेतली आहे. त्यामुळे ते राजकारण करत आहेत, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. यावेळी श्रीकांत शिंदे यांना मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

“काही लोक नशा करून आरोप करत असतात. नशा करून बोलणाऱ्यांना मी उत्तर देत नाही मी बांधील नाही, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. या प्रकरणाची समितीकडून चौकशी सुरू आहे. ही घटना दुर्दैवी आहे. कुणालाही सोडणार नाही. असं व्हायला नको. त्या ठिकाणी आता नौदल आणि सरकार यांच्या माध्यमातून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार हे नौदलाला सहकार्य करेल. पुतळा कसा पडला याची चौकशी नौदल आणि सरकार यांच्या माध्यमातून केली जात आहे. पुन्हा असला प्रकार घडणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेईल”, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

“प्रत्येक गोष्टीचा राजकारण करायचं हे विरोधकांनी ठरवलेलं आहे. कुठलाही प्रकार घडला की राजकारण करायचं. त्यावरुन वेगवेगळे आरोप करायचे, असा प्रकार विरोधकांकडून सुरू आहे. अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री यांचे नेतृत्वात महाराष्ट्रात जे काम झालं ते काम पाहून सरकारला बदनाम करण्याचं काम विरोधक करत आहेत. लाडकी बहीण योजना एवढी सुपर डुपर हिट झाली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये लाडकी बहिण योजनेचे काम विरोधक करत आहेत”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.