मनिष मसोळे, टीव्ही 9 मराठी, धुळे / 1 सप्टेंबर 2023 : भरधाव ट्रकचा ब्रेक झाल्याने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील बिजासण घाटात ट्रकने बसला मागून धडक दिली. यात बसचा भीषण अपघात होऊन दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले. सदर अपघातग्रस्त बस मध्य प्रदेश परिवहन मंडळाची होती. अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना शेंधवा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश परिवहन विभागाची इंदौर नाशिक बस शेंधवाहून शिरपूरच्या दिशेने चालली होती. मध्य प्रदेश महाराष्ट्र सिमेवरील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील बिजासण घाटात असताना एका ट्रकचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्याने सदर ट्रकने बसला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत बस रस्त्यावर पलटली. यात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बिजासण पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मदतकार्य सुरु केले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी मदतकार्य राबवत महामार्गावरील वाहतूकही सुरळीत केली.