दिनेश दुखंडे, नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरुन आज दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदेतील कार्यालयात बैठक पार पडली. शाह यांनी या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिल्लीत बोलावलं होतं. अखेर अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून सीमावादाच्या प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाला आहे. त्यामुळे सीमावादावर सुरु असलेला तणाव कदाचित शमू शकतो. अमित शाह यांनी बैठकीनंतर स्वत: पत्रकार परिषद घेत सीमावादावर दोन्ही राज्याकडून कोणताही दावा केला जाणार नाही, असं स्पष्ट केलं. तसेच संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या वादावर निकाल येत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी काळजी घेतली जाणार असल्याची आणि सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती शाह यांनी दिली.
विशेष म्हणजे सीमावादावरुन संसदेत अमित शाह यांच्या कार्यालयात बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. त्यावेळी तिथे महाराष्ट्रातील इतर खासदार उपस्थित होते. थोड्यावेळाने तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस एकत्र अमित शाह यांच्या निवासस्थानी गेले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या घरी आज शिंदे-फडणवीस यांच्यासाठी डिनर डिप्लोमसी आयोजित करण्यात आलीय. या डिनर डिप्लोमसीच्या निमित्ताने शाह यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी खलबतं होण्याची दाट शक्यता आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. कदाचित शिंदे-फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
महाराष्ट्रात मुंबई महापालिका आणि इतर महत्त्वाच्या शहरांमधील निवडणुका जवळ आल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून महामोर्चाची तयारी केली जातेय. महाविकास आघाडीकडून राज्य सरकारला घेरण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जातोय. असं असताना भाजपची रणनीती काय असेल, याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. त्यामुळे या वादावरही कदाचित अमित शाह यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.