शिंदेंचे खासदार संदीपान भुमरे 2019 पासून मंत्रिपदी असताना भुमरेंनी 6 दारुच्या दुकानांचं लायसन्स मिळवलं. त्यामुळं पदाचा दुरुपयोग केल्यानं भुमरेंवर कारवाई करा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. मंत्री असताना संदीपान भुमरेंनी, पत्नी, सून आणि नातेवाईकांच्या नावानं वाईन शॉपचे लायसन्स मिळवल्याचा आरोप पुराव्यानिशी झालाय. छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोर्डेंनी माहिती अधिकारात भुमरेंनी काढलेल्या दारुच्या दुकानांच्या लायन्सची माहिती मिळवली आहे.
सून वर्षा विलास भुमरेंच्या नावानं 3 लायसन्स आहेत. तिन्ही लायसन्स विरांश वाईन्स नावानं असून, पहिलं लायसन्स वाळूंज, औरंगाबादचं आहे. दुसरं लायसन्स पुण्यातलं आहे आणि तिसरं लायसन्स जळगावचं आहे. 2 लायसन्स ही भुमरेंच्या पत्नीच्या नावानं आहे. वर्षा संदीपान भुमरेंच्या नावानंही विरांश वाईन्स म्हणूनच लायसन्स काढलेत. जालना आणि जळगावसाठी हे लायसन्स काढण्यात आलंय. एक लायसन्स हे मिसेस काकडे आणि रेवाडकर यांच्या नावानं सागर वाईन्ससाठी काढण्यात आलं आहे आणि लोकेशन आहे, पारोळा, औरंगाबाद. भुमरेंचे हे नातेवाईक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
2019 आधी मंत्री नसताना भुमरेंच्या कुटुंबीयांकडे एकही लायसन्स नव्हतं. पण मंत्री होताच एवढी लायसन्स मिळवल्याचं ठाकरे गटाच्या गोर्डेंचं म्हणणं आहे. त्यामुळं लायसन्स रद्द करुन कारवाईची मागणी गोर्डेंनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मंत्री असताना स्वत: किंवा कुटुंबात अशाप्रकारे लाभ घेता येत नाही. तरीही मंत्रिपदाचा गैरवापर करुन भुमरेंनी दिशाभूल केल्याचा आरोप आहे. तसंच कुटुंबाचं उत्पन्न 2 कोटी मग वाईन शॉपसाठी जमीन खरेदी आणि लायसन्ससाठी 5 कोटी कुठून आणले. त्यावरुन मनी लाँड्रिंगचा आरोपही दत्ता गोर्डेंनी केला आहे.
भुमरेंची दारुची दुकानं आणि लायसन्स वरुन महायुतीत येण्याआधी जाहीरसभेत अजित पवारांची जोरदार टीका केली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही भुमरेंच्या दारुच्या दुकानांचा विषय तापला होता. भिंगरी भिंगरी म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भुमरेंना डिवचलं होतं. भुमरे आता खासदार आहेत. त्यामुळं कारवाई करुन त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. त्यामुळं कारवाई न झाल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी दत्ता गोर्डेंनी केली आहे.