अक्षय मंकनी, मुंबई, दि. 9 फेब्रुवारी 2024 | राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेशी थेट हृदयातून संवाद साधला आहे. रश्मी शुक्ला यांनी यासाठी पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्रास होत असेल आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना न्याय मिळू शकत नसेल, तर ही गोष्ट पोलीस महासंचालक कार्यालयात आमच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसेल तर महासंचालकांना संपर्क करता येईल. महाराष्ट्र पोलिसांच्या सोशल मीडियावर हे पत्र दिले आहे.
मी राज्य पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारून एक महिना झाला आहे. हे औचित्य साधत राज्याच्या सर्व पोलिसांच्या वतीने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि या अल्प कालावधीत मिळालेली शिकवण आणि पुढील वाटचालीच्या दृष्टीने माझे ध्येय तुमच्यासोबत शेअर करते.
महाराष्ट्र पोलीस दलातील समर्पित स्त्री-पुरुषांच्या बरोबरीने पुन्हा एकदा सेवा आणि संरक्षण करण्याच्या या विशेषाधिकाराबद्दल मी आधीच आभार व्यक्त करते. मी आतापर्यंत जे पाहिले आहे, अनुभवले आहे त्यावरून मला खात्री आहे की महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपेकी एक आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पांठिबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून, तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहील
केंद्रीय पोलीस दलाचे नेतृत्व करताना मिळालेल्या अनमोल अनुभव गाठीशी घेऊन मी राज्यात परतले आहे. राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक आणि उच्च दर्जाच्या वागणुकीचे पालन करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. आम्ही पोलीस आणि जनता यांच्यातील पूल पुन्हा बांधू पोलीस दलातील कोणत्याही सदस्याकडून हिंसा, शोषण किंवा गैरवर्तनाची कोणतीही अन्यायकारक कृत्ये आमच्याकडून खपवून घेतली जाणार नाहीत. जर राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्रास होत असेल आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना न्याय मिळू शकत नसेल, तर ही गोष्ट पोलीस महासंचालक कार्यालयात आमच्या निदर्शनास आणून देण्याची मी विनंती करते. माझे सहकारी आणि मी तुम्हाला लवकरात लवकर मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू
आमचे पोलीस दल सुरक्षितता आणि परिणामकारकतेने त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक संसाधने आणि प्रशिक्षणाने सुसज्ज आहेत. त्याची खात्री करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. डीजीपी या नात्याने दररोज आपला जीव धोक्यात घालणाऱ्या धाडसी पोलिसांना मी सर्वतोपरी पाठिंबा देईल.
आपल्यासमोर अनेक निरनिराळी आव्हाने आहेत आणि आपल्याला निश्चितच काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. पण मी तुम्हाला खात्री देते की माझ्या कार्यकाळात महाराष्ट्र पोलीस या आव्हानांना न डगमगता किंवा पक्षपातीपणा न ठेवता सामोरे जातील. या कार्यात आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही. या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला तुमचे सहकार्य आवश्यक आहे. त्या कालावधीत तुमच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी तुमच्याशी थेट संपर्क साधण्यास उत्सुक आहे. तोपर्यंत आपण मला पाठिंबा द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. कारण आपण सर्व एकत्रितपणे या नवीन अध्यायाला सुरुवात करत आहोत. जिथे प्रत्येकजण निर्भयपणे जगू शकेल, काम करू शकेल आणि भरभराट करु शकेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही अविरत कार्य करु.
हा संदेश थेट हृदयातून!
मा. महासंचालक महाराष्ट्र पोलीस, रश्मी शुक्ला यांचे सर्व नागरिकांना आवाहन, मजबूत महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्रासाठी एकत्र या.#जय_हिंद #जय_महाराष्ट्र pic.twitter.com/hrbS9pjTKY
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) February 9, 2024