कोल्हापुरात सतेज पाटील VS महाडिक वाद शिगेला, कारखान्याच्या संचालकांना बेदम मारहाण

| Updated on: Jan 02, 2024 | 11:14 PM

कोल्हापुरात सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यातील वाद आज शिगेला पोहोचला. विशेष म्हणजे राजाराम सहकारी कारखान्या संचालकांना आज तरुणांच्या जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कोल्हापुरात सतेज पाटील VS महाडिक वाद शिगेला, कारखान्याच्या संचालकांना बेदम मारहाण
Follow us on

भूषण पाटील, Tv9 मराठी, कोल्हापूर | 2 जानेवारी 2024 : कोल्हापुरात आमदार सतेज पाटील विरुद्ध खासदार धनंजय महाडिक यांच्यातील वाद उफाळून आला आहे. राजाराम सहकारी कारखान्याच्या संचालकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. संबंधित मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीत मारहाण करणारे स्पष्टपणे दिसत आहेत. कारखान्याविरोधात सतेज पाटलांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर संचालकांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या संचालकांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. या मारहाण प्रकरणानंतर महाडिक गट आक्रमक झालाय. मारहाणीनंतर धनंजय महाडिक आणि अंमल महाडिक यांनी संचालकांची भेट घेतली आहे.

संचालकांना झालेल्या मारहाणीत सतेज पाटलांचा हात असल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे. सतेज पाटलांच्या गुंडांकडून संचालकांना मारहाण करण्यात आली आहे, असा आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे. मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय महाडिक यांनी केली. दरम्यान, मारहाणीच्या समोर आलेल्या व्हिडीओत एका जमावाने संचालकांना किती भयानक मारहाण केली ते स्पष्टपणे दिसत आहे. तरुणांच्या एका जमावाने संचालकांना गाडीतून बाहेर काढलं. त्यांना प्रचंड मारहाण केली. संचालकांच्या अंगावरील शर्ट फाटेपर्यंत तरुणांनी त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर संचालकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मारहाणीची ही घटना एसपी ऑफिस चौकात घडल्याची माहिती समोर आली आहे.

‘हे योग्य नाही’

या घटनेवर धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. “सगळं व्हिडीओमध्ये स्पष्ट आहे. कुठलाही चालक अशी कुणाच्याही अंगावर गाडी घालत नसतो. तो त्यांना अडवून, थांबवून… मला सांगा ते त्या रस्त्याने निघाले हे त्यांना माहिती कसं आहे? हे एवढे सगळे लोक तिथे जमले कसे होते? हे सगळे जमवून, पाठलाग करुन, टीप घेऊन, कुठून येतात बघून, अडवून, गाडीच्या बाहेर काढून, लाथा-बुक्क्यांनी खाली पाडून एका सभ्य माणसाला प्रचंड दहशत करुन मारहाण करण्यात आली. हे योग्य नाही. त्यांच्यावर प्रचंड कडक कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी धनंजय महाडिक यांनी केली.

‘हा शंभर टक्के पूर्वनियोजित कट’

“हा शंभर टक्के पूर्वनियोजित कट आहे. यामध्ये सतेज पाटलांचा हात आहे. त्यांनी आज सकाळी बैठक घेऊन, मोर्चा घेऊ असं म्हटलं होतं. त्याच संध्याकाळी हे सगळं घडतंय, त्यांनीच त्यांच्या श्वानांना आदेश दिला असेल की, तुम्ही हे करा. त्याशिवाय हे एवढं धाडस करणार नाहीत. महाडिकांच्या कारखान्यात काम करणाऱ्या माणासाला हात लावण हे थोडसं कठीण आहे. पण ते सतेज पाटलांच्या आदेशाने झालं आहे. बघुया काय करायचं ते”, असं धनंजय महाडिक म्हणाले.