नाशिकः नाशिक फुलांचे शहर. नाशिक द्राक्ष बागांचा जिल्हा. इथले पर्यटन आणि इतिहास देशभरातल्या पर्यटकांना भुरळ घालतो. प्रभू रामचंद्रांपासून ते छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. याच मातीत जेसबीने खोदकाम करताना एका अज्ञात भुयारी मार्गाचा शोध लागला. पाहता-पाहता ही बातमी क्षणार्धात सगळीकडे पसरली आणि हा रस्ता पाहण्यासाठी घटनास्थळी तोबा गर्दी उसळली.
नवशा गणपतीजवळ खोदकाम
नाशिकमध्ये सारे काही अचंबित करणारे घडते. याची नाना उदाहरणे देता येतील. नेमके आताही अगदी तसेच तेही ऐतिहासिक अशा आनंदवल्ली परिसरात घडले. या भागात गेल्या तीनशे वर्षांपासून ऐतिहासिक वारसा असलेली आनंदीबाईंची गडी आहे. ती सर्वांनाच परिचित आहे. मात्र, आता ही गडी पूर्णपणे ढासळलेली आहे. या ठिकाणी फक्त तिचे काही अवशेष ग्रामस्थांना बघायला मिळतात. या आनंदवली परिसरातील नवशा गणपतीजवळ देवराम साठे या विकासकाच्या खासगी जागेत जेसीबीच्या साह्याने सकाळपासून खोदकाम सुरू होते. त्यात अचानक एक भुयारी मार्ग सापडला. जेसीबी चालकाने तात्काळ ही माहिती इतरांना दिली. एकापासून दुसऱ्यापर्यंत असे करत ही बातमी आनंदवल्ली भागात पोहचली. शहरातही अनेक ठिकाणी लगोलग खबर गेली. त्यामुळे नागरिकांनी हा भुयारी मार्ग पाहण्यासाठी एकच गर्दी केली.
आनंदवल्लीचा इतिहास रंजक
आनंदवल्ली परिसरात गोदावरी नदीच्या काठावर मंदिराच्या पूर्वेस आनंदबाई यांची भव्य गढी होती. ब्रिटीश राजवटीत येथे आग लागली. त्यात गढी नष्ट झाली. आनंदवल्ली भागाचा इतिहास मोठा रोचक आहे. पूर्वी हा भाग एक लहान खेडे होता. त्याला चावंडस किंवा चौंधस म्हटले जायचे. रघुनाथराव उर्फ राघोबादादा पेशवे हे थोरले माधवराव पेशवे यांच्यावर नाराज होऊन या भागात राहिले होते. तो कालखंड 1764 चा होता. याच वर्षी डिसेंबर महिन्यात केसो गोविंद यांची चावंडस येथे नियुक्ती झाली. रघुनाथराव पेशव्यांनी चावंडस येथे आनंदीबाईसाठी एक मोठा वाडा त्या काळी बांधला. येथेच 2 ऑगस्ट 1764 रोजी आनंदीबाईंचे पहिले पुत्ररत्न जन्मास आले. त्याच आनंदात या गावाचे नाव आनंदवल्ली ठेवल्याचे म्हटले जाते.
पुरातत्व खात्याचा तपास
आनंदवल्ली भागात सापडलेला भुयारी मार्ग नेमका जातो कुठे, या मार्गाचा कशासाठी वापर केला जायचा, या मार्गाचा कालखंड कधीचा असू शकतो, या मार्गाची निर्मिती नेमकी कोणी केली, याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे का, याचा तपास आता पुरातत्व विभागाने सुरू केला आहे. त्यासाठी वेगवेगळे संदर्भ तपासले जात आहेत. दरम्यान, या ठिकाणाची पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पेशवेकाळात पाण्याचा निचरा होण्यासाटी आणि संकटकाळातील गुप्त मार्ग म्हणून या भुयाराचा वापर केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वर्चस्ववादातून रक्तचरित्र, उद्योगनगरी नाशिकमध्ये खुनामागून खून; डोक्यात दगड घालून तरुणाला संपवले