मुंबई : पुरवणी मागण्यांद्वारे आमदारांना निधी वाटप करण्यात आलय. त्यावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी देण्यात आलाय. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना निधी वाटपात झुकतं माप दिल्याच बोलल जातय. अजित पवारांसोबत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरभरुन निधी देण्यात आलाय. त्याचवेळी शिंदे गटालाही खूश करण्याचा प्रयत्न झालाय.
यावर खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निधी वाटपात कोणावरही अन्याय झालेला नाही. सर्व आमदारांना समसमान निधी वाटप झालय. विरोधक आरोप करतायत, पण त्यात तथ्य नाहीय” अशी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘माझ्या मतदारसंघात एकही रुपया नाही’
पुरवणी मागण्याद्वारे अजित पवार यांनी 1500 कोटींच निधी वाटप केलय. “माझ्या मतदारसंघात एकही रुपया आलेला नाही. 2021च्या बजेटमध्ये 70-80 कोटीचा निधी मिळाला होता. त्यात बांधकाम, ग्रामीाण विकास नगरविकास, जलसंधारणसाठी निधी होता. तो सर्व निधी थांबवलाय” असा आरोप काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी केलाय.
‘मी उपमुख्यमंत्र्यांना दोन-तीनदा भेटलो’
“मी उपमुख्यमंत्र्यांना दोन-तीनदा भेटलो. बांधकामाचा निधी कार्यकारी अभियंता, उप अभियंता प्रस्तावित करतो. राज्य, नॅशनल हायवेच्या रस्त्यांमध्ये आमदारांचा सहभाग नसतो. राजुरा विधानसभा मतदासंघाची सीमा तेलंगणला लागून आहे” असं सुभाष धोटे म्हणाले.
तेलंगणमध्ये चांगले रस्ते
“तेलंगणमधील रस्ते चांगले आहेत. तेलंगणमधून व्यक्ती महाराष्ट्रात येतो, तेव्हा त्याची गाडी खड्ड्यात जाते. तेव्हा, तो आपल्या राज्याला शिव्या देतो. कमीत कमी बांधकाम विभागाचा निधी दिला पाहिजे. त्या भागातील रहिवाशांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत” असं सुभाष धोटे म्हणाले.
त्या रस्त्यावरुन काँग्रेसचेच लोक जात नाहीत
“रस्त्यासाठी निधी मंजूर केला, तर त्या रस्त्यावरुन काँग्रेसचेच लोक नाही, तर सर्वच लोक प्रवास करतात” असं धोटे म्हणाले. “दादांबरोबर सत्तेत गेलेल्या आणि नाही गेलेल्या आमदारांना 25 ते 50 कोटीचा निधी दिलाय. काँग्रेसच्या एखाद दुसऱ्या आमदाराला निधी मिळाला असेल” असं सुभाष धोटे यांनी सांगितलं.