नाशिकः नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल 28 हजार 165 प्रकरणांचा निपटारा झाला आहे, तर 60 लाख 35 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्यामार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी दिली.
हे दावे निकाली
कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या लोकअदालतीच्या माध्यमातून नाशिक न्यायालयात प्रलंबित व दावादाखल प्रकरणे मिळून 16 हजार 679 प्रकरणे व मोटार वाहनाच्या थकीत ई-चलन प्रकरणांपैकी 11 हजार 486 असे एकूण 28 हजार 165 प्रकरणांचा यावेळी निपटारा करण्यात आला आहे.
कोट्यवधींची तडजोड रक्कम
लोकअदालतीत कलम 138 अंतर्गत 623 प्रकरणे, मोटार वाहन अपघात 229 प्रकरणे, कामगार विषयक 14, कौटुंबिक वादाची 140, फौजदारी तडजोडपात्र 557 प्रकरणे व इतर 1 हजार 29 अशा एकूण 2 हजार 592 प्रलंबित प्रकरणांचा निपटारा यावेळी करण्यात आला आहे. लोकन्यायालयात जिल्ह्यातून एकूण दाखलपूर्व 1 लाख 29 हजार 632 प्रकरणांपैकी 14 हजार 87 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या सर्व प्रकरणांमध्ये 44 कोटी 76 लाख 52 हजार 449 इतकी तडजोड रक्कम समाविष्ट करण्यात आली असल्याचेही दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी सांगितले आहे.
30 डिसेंबर रोजी डाकअदालत
डाक विभागातर्फे ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी 30 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ग्राहकांनी 15 डिसेंबर 2021 पूर्वी वरिष्ठ अधीक्षक, नाशिक डाक विभाग यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन नाशिक डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे. डाक विभागाचा आता फक्त पत्रापुरता संबंध नसतो. त्यामुळे डाक विभागाबाबत ग्राहकांच्या असंख्य तक्रारी असतात. त्यामुळेच नाशिक डाक विभागातील ग्राहकांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दीर्घ काळापासून ज्या ग्राहकांच्या समस्या सुटल्या नाहीत, त्यावर मार्ग काढण्यात येणार आहे.
Nashik| नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण; दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह
निवडणुकांचा हंगाम, मतदानकार्ड नाहीय? ऑनलाईन कसं मागवायचं माहितीय का?
Raj Thackeray | लोक मला फुकट घालवत आहे, राज ठाकरेंनी बोलून दाखवली सल…