मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी नोंदी देण्यास विरोध केलाय. भुजबळ यांनी आपल्या सरकारच्या विरोधातच भूमिका मांडली आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी सरकारने जी कृती केली त्या कृतीवर छगन भुजबळ यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलंय. कुणबी नोंदींवरुन मराठ्यांना दिल्या जाणाऱ्या कुणबींच्या जातप्रमाणपत्रावरुन मंत्री भुजबळच सरकारवर तुटून पडले आहेत. यावरुन अजित दादांच्या गटाचे बडे मंत्री भुजबळ यांना आता शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय. भुजबळांना भडक बोलण्याची सवय आहे, जे होणार नाही ते होणार असल्याचं सांगून आपण फार मोठे आहोत हे दाखवण्याचा भुजबळांचा प्रयत्न असतो, अशी टीका मंत्री देसाई यांनी केली आहे.
जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळी सरकारनं निवृत्त न्यायमूर्तींना पाठवलं होतं. त्यावरुनही भुजबळांनी टीका केली होती. त्या टीकेलाही मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय. तर मंत्री भुजबळांची प्रतिक्रिया स्वाभाविक असून, सरकारचा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
सरकारमध्येच मंत्री विरुद्ध मंत्री असा सामना सुरु झाला असताना, भुजबळ ओबीसींचं नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांचीही काही मतं आहेत, असं म्हणत दादांच्याच गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. तर ज्या पद्धतीनं ओबीसी नेते म्हणून भुजबळ उघडपणे समोर येऊन बोलत आहेत. त्याप्रमाणे मराठा नेत्यांनीही पुढं यावं, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय.
एकंदरितच, ज्यांच्या नोंदी सापडतील त्या मराठ्यांना कुणबीचं दाखले देणं सुरुच राहणार आहे. त्या नोंदींच्या संख्येवरुन भुजबळांनी सवाल केले असले तरी सरकार मागे हटण्यास तयार नाही. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपल्याच सरकारच्या विरोधात मंत्री भुजबळ उभे ठाकलेत, हे स्पष्ट दिसंतय.