रत्नागिरी | 16 फेब्रुवारी 2024 : रत्नागिरीत ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांची आज गुहारगरमध्ये सभा आयोजित करण्यात आलीय. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा गुहागर हा मतदारसंघ आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला आपण त्यांच्या मतदारसंघात येऊन सभा घेऊन उत्तर देऊ, असं चॅलेंज निलेश राणे यांनी दिलं होतं. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरु होता. हा संघर्ष आज थेट रस्त्यावर पोहोचला. निलेश चव्हाण आज चिपळूणमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी गर्दी पांगवली. त्यानंतर परिसरात आता तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे.
कोकणात होळी सणाच्या आधीच राजकीय शिमगा रंगताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रत्नागिरी येथील मतदारसंघात जावून टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी जाधवांना चॅलेंज दिलं होतं. भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात येऊन त्यांच्या टीकेला उत्तर देऊ, असं निलेश राणे म्हणाले होते. त्यानुसार निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये सभा आयोजित करण्यात आली. निलेश राणे यांचं अतिशय वाजत गाजत भाजप कार्यकर्त्यांनी चिपळूणमध्ये स्वागत केलं. भाजपकडून मोठं शक्तीप्रदर्शन आज करण्यात आलं. पण याच दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही निलेश राणे यांच्या ताफ्यातील काही कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या काचादेखील फुटल्याची माहिती समोर येत आहे.
निलेश राणे यांचा ताफा गुहागरमध्ये सभास्थळी जात असताना संबंधित प्रकार घडला. भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात निलेश राणे यांना सभास्थळी नेलं जात होतं. त्यांची मिरवणूक चिपळूण येथील भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर आली तेव्हा मोठा राडा झाला. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही जण जखमी झाले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बॅरेकेट्स लावून रस्त्याच्या एका कडेला करण्यात आलं आणि निलेश राणे यांचा ताफा जाण्यासाठ जागा करण्यात आली. त्यानंतर भाजपची मिरवणूक वाजत गाजत पुढे जात होती. यावेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ठाकरे गटाकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना इकडे या म्हणून आव्हान दिलं जात होतं. ते पाहून भाजप कार्यकर्त्यांकडूनही आव्हान दिलं जात होतं.