पुणे : दीपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 1 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून ते 30 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण मनाई करण्यात आली आहे. (Firecrackers above 125 decibels are banned in Pune)
या कालावधीत 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या आणि 125 डेसीबल पेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे सर्व साखळी फटाके उडविण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही रस्त्यावर किंवा रस्त्यापासून 50 फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारु काम सोडणे किंवा फेकणे, आगी फुगे (फायर बलून) किंवा अग्नीबाण सोडणे किंवा उडविण्यास बंदी असेल. एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
साखळी फटाका 50 ते 100 तसेच 100 व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 110 किंवा 115 व 125 डेसीबलपेक्षा जास्त असता कामा नये. या आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनीयमाच्या कलम 131 प्रमाणे कायदेशीर शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनानंतर पहिल्यांदाच साजऱ्या होणाऱ्या दिवाळसणाला पुणेकरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पोलीस प्रशासनाकडून पुण्यात विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दिवाळीनिमित्त तात्पुरते फटाके विक्रीसाठी पोलिसांकडून परवाने वितरीत करण्यात येतील.
27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीसाठी हे परवाने ग्राह्य असतील. मात्र, या कालावधीतही विक्रेत्यांना विदेशी फटाक्यांची विक्री करता येणार नाही.तसेच रस्त्यापासून 10 मीटर अंतराच्या आत कोणत्याही प्रकराचे फटाके अथवा शोभेची दारू उडविण्यास बंदी असेल. त्यामुळे आता या निर्णयावर फटाक्यांचे व्यापारी आणि पुणेकरांमध्ये काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.
पुण्यात डॉक्टर्स, दोन्ही महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नानं पुणे लसीकरणात आघाडीवर आहे. राज्याच्या तुलनेत बारा टक्के लसीकरण पुण्यानं केलं. तर देशाच्या तुलनेत दहा टक्के लसीकरण महाराष्ट्रानं केलं आहे. राहिलेलं लसीकरण वेगात कसं करता येईल याची चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 22 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्यावेळी लोक प्रतिनिधींच्या मागणीवरून दिवाळी पहाटला मंजुरी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आठवडी बाजार सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. शहरी भागातील आठवडी बाजार सुरु झालेत, असं अजित पवार यांनी मागील शुक्रवारी सांगितलं होतं. तसंच ग्रामीण भागातील आठवडी बाजार, तसंच सर्व सिनेमा थिएटर्स आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु केली आहेत. दिवाळी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं शंभर टक्के उपस्थिती ठेवायला परवानगी देऊ, असं अजित पवार म्हणाले होते.
इतर बातम्या :
Firecrackers above 125 decibels are banned in Pune