गजानन उमाटे, नागपूर | 7 नोव्हेंबर 2023 : मुसळधार पाऊस असो की हवेत गारठा असो अनेकांना अशा वातावरणात चहा हवा असतो. परंतु काही जणांना रणरणत्या उन्हातही चहाची तल्लफ येते. कधी झोप येत असेल तर कधी अभ्यासासाठी जागायचे म्हणून चहा घेतला जाता. यामुळे चहाचे स्टॉल गल्लीबोळात दिसतात. पुणेकरांनी चहाला अमृततुल्याची उपमा दिली आहे. पुण्यातील चहाच्या दुकानांना अमृततुल्य नाव दिलेले आहे. परंतु एका डॉक्टराने चहासाठी कमालच केली. या डॉक्टर महोदयांनी चहासाठी शस्त्रक्रिया अर्धवट सोडली. उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला. आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. डॉक्टराने केलेल्या या प्रकारामुळे रुग्णाचा जीव टांगनीला होता.
नागपूर जिल्ह्यातील हा प्रकार आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना भूलचे इंजेक्शन डॉक्टरांनी दिले. परंतु त्यानंतर त्यांना चहा मिळाला नाही. यामुळे डॉक्टर नाराज झाले. त्यांची ही नाराजी रुग्णासाठी तापदायक ठरली. कारण डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता पळ काढला. डॉ. भलावी असे संतापलेल्या डॉक्टरचे नाव आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा धक्कादायक प्रकार आहे. चहासाठी त्यांनी शस्त्रक्रिया सोडल्याचा हा प्रकार वरिष्ठांना कळाला.
डॉ. भलावी यांनी चहा दिला नाही शस्त्रक्रिया अर्ध्यावरच सोडून दिली. यामुळे ऑपरेशनसाठी भूल दिलेल्या चार महिलांना ताटकळत राहावं लागलं. हा प्रकार वरिष्ठांकडे गेल्यानंतर तातडीने दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली. जिल्हा परिषदेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्रिसदस्य समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. डॉक्टर रुग्णासाठी २४ तास उपलब्ध असतात. अत्यवस्थ रुग्णावर रात्रीअपरात्री डॉक्टर उपचार करतात. परंतु डॉ.भलावी यांनी केलेल्या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. डॉक्टरावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.