डोंबिवली : आता राज्यातील महापालिकांच्या निवडणूका (Municipal Elections) होण्याची शक्यता आहे. त्यातच आता डोंबिवलीतील रहिवाशांना तब्बल 52 तास पाण्याविना रहावे लागल्याचे समोर आले आहे. तर पाणी नसल्याने डोंबिवलीकर हैराण झाले होते. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झालेल्या डोंबिवलीकरांनी (Dombivali Residents)आज एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक मारली. तसेच यावेळी एमआयडीसीच्या अभियंत्यांना खंडित झालेल्या पाणीपुरवठ्याबाबत डोंबिवलीकरांनी चांगलंच धारेवर धरलं. त्यावेळी अंबरनाथ शहरातून येणारी जलवाहिनी (Water Canal) फुटल्यानं शटडाऊननंतर पुन्हा आणखी काही तास पाण्यावाचून डोंबिवलीकरांना काढावे लागले, असं स्पष्टीकरण एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिलं.
डोंबिवली एमआयडीसीतील रहिवासी भागाला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होतो. शुक्रवारी या परिसरात एमआयडीसीकडून 24 तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर 52 तास पाणीपुरवठा बंदच राहिल्याने डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल झाले. अंबरनाथ शहरातून येणारी जलवाहिनी फुटल्यानं शटडाऊननंतर पुन्हा आणखी काही तास पाण्यावाचून डोंबिवलीकरांना काढावे लागले, असं स्पष्टीकरण एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिलं.
डोंबिवली एमआयडीसी या भागात वारंवार पाणीपुरवठा खंडित आणि कमी दाबाने होत असल्यानं आज डोंबिवलीकरांनी एमआयडीसी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलन तसेच टँकर माफियांना मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असताना रहिवासी भागावर हा अन्याय का? असा सवाल यावेळी अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. येत्या काळात हीच परिस्थिती राहिली, तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डोंबिवलीकरांनी यावेळी दिला.
पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम
सध्या पाणीपुरवठा सुरळीत झाला असून शटडाऊनची माहिती नागरिकांना देण्यात आली होती. मात्र काम झाल्यावर अचानक जलवाहिनी फुटल्यानं आणखी काही तास पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे.
– विजय धामापूरकर, एमआयडीसी अभियंता
ही टंचाई कधी संपणार?
डोंबिवली एमआयडीसी परिसर आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून पाण्याची मोठी टंचाई भासतेय. याच भागात खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळं ही टंचाई कधी संपणार? असा प्रश्न आता विचारला जातोय.
– निनाद करमरकर, डोंबिवली