नवी मुंबई : वाशी सेक्टर 9 मधील जैन मंदिरासमोर गटाराचे खोदकाम सुरू असताना महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याने वाशी परिसरात गॅसच्या वासाने नागरिक भयभीत झाले. मात्र वाशी अग्निशमन दल आणि महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी वेळीच या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या गॅस गळतीने अर्ध्या वाशीचा घरघुती गॅस पुरवठा खंडित झाला (Gas pipeline burst in Vashi).
वाशी सेक्टर 9 मध्ये जैन मंदिरासमोर नवी मुंबई महापालिकेच्यावतीने गटार बांधण्याचे काम सुरू आहे. या कामाचे खोदकाम सुरू असताना त्याठिकाणी असलेल्या महानगर गॅस घरघुती पुरवठा करणाऱ्या गॅस लाईनला जेसीबीचा फटका लागला. त्यामुळे पाईपलाईन फुटली. ही घटना आज (31 डिसेंबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरु झाली. मात्र या ठिकाणी समोरच असलेल्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन गॅस आणि पाण्याचा प्रवाह सुरु ठेवला. त्यानंतर महानगर गॅसतर्फे त्या पाईपलाईनचा पुरवठा बंद करण्यात आला.
दरम्यान, गॅस बाहेर पडत असल्याने वाशी विभागात सर्वत्र वास येत असल्याने नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर बाहेर पडले. यादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून वाशी वाहतूक पोलीस आणि वाशी पोलिसांनी त्याठिकाणची संपूर्ण वाहतूक दुसरीकडे वळवली. जवळपास एक तास सतत पाण्याचा प्रवाह या गॅस गळतीवर अग्निशमन दलाने सुरू ठेवला. तर सदर गॅस पाईपलाईनला सुमारे चार ते पाच तास दुरुस्तीला लागल्याने घरघुती गॅस आणि अवलंबून असणारे अर्ध्या वाशीतील नागरिक प्रभावित झाले.
सदर ठिकाणी गॅस गळती होत असल्याचं समजताच अग्निशमन दलाने क्षणाचाही विलंब न लावता त्यावर पाण्याचा प्रवाह सुरू ठेवला. गॅस लाईनचा पुरवठा खंडित केल्यानंतर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही गॅस गळती थांबली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही (Gas pipeline burst in Vashi).
हेही वाचा : सर्वत्र ग्रामंपचायतीची रणधुमाळी सुरु, चंद्रपूरच्या घुग्घुस गावाचा बहिष्काराचा निर्णय, काय कारण?