पवार कुटुंब कोणी फोडलं; सुप्रिया सुळेंनी थेट नेत्याचं नाव घेतलं

| Updated on: Nov 15, 2024 | 5:57 PM

सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना गंभीर आरोप केला आहे.

पवार कुटुंब कोणी फोडलं; सुप्रिया सुळेंनी थेट नेत्याचं नाव घेतलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विधानसभा निवडणुसाठी येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? पुन्हा महायुती सत्तेत येणार की महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रात असे काही विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्या मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या राज्याच लक्ष लागलं आहे. त्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. लोकसभेनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातीलच दोन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पवार काका पुतण्यामध्ये ही लढत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजित पवार स्वत: ही निवडणूक लढवत आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आता या निवडणुकीकडे आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

80 वर्षाचे वडील लढत आहेत. त्यांची साथ सोडायची नाही असं ठरवलं आहे.  आजीनी रडायला नाही लढायला शिकवलं आहे. आशा काकींनी लहान असताना खूप लाड केले. पवार साहेबाना ताकद बारामतीने दिली आहे . युगेंद्र यांनी लोकसभेला जास्त मेहनत घेतली. घरात लढाई नको होती. पक्ष फुटला त्याला सुप्रिया सुळे कारणीभूत असे देवेंद्र फडणवीस म्हणतात, पण देवेंद्र फडणवीसांनीच घर फोडलं असा आरोप यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की माझ्या बहिणीच्या घरी ईडी लावली त्यांना खुप त्रास दिला.
बारामतीचे आजच जे चित्र आहे, त्याला भाजप जबाबदार आहे.  आत्या म्हणून एक अट आहे बारामतीत महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत. मलिदा गँग बंद झाली पाहिजे. बारामतीचे पैसे बारामतीमध्ये राहिले पाहिजेत, असा टोलाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.