ठाणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत (ED attaches immovable assets). 6.45 कोटी रुपयांच्या या मालमत्ता आहेत. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ईडीने थेट मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवरच कारवाई केल्याने मुख्यमंत्र्यांसाठी हा मोठा हादरा असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीने आतापर्यंत राज्यात अनेक मालमत्तांवर धाडी मारल्या होत्या. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली आहे. तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांची ईडीने चौकशीही केली आहे. स्वत: संजय राऊत यांच्या पत्नीलाही ईडीने समन्स बजावलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत ईडी आली नव्हती. ईडीकडून मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ईडीने पुष्पक बुलियनमधील पुष्पक ग्रुप कंपनीची 6.45 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. निलांबरी प्रकल्पातील या 11 निवासी फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे फ्लॅट्स आहेत. श्रीधर माधव पाटणकर हे या कंपनीचे मालक आहेत.
पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत 6 मार्च 2017पासून पुष्पक बुलियन आणि ग्रुप कंपनीजवर मनी लॉन्ड्रिंगची केस सुरू आहे. यापूर्वीही ईडीने पुष्पक बुलिनय कंपनीतील महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील 21.46 कोटीची संपत्ती जप्पत केली आहे.
ED attaches properties worth Rs. 6.45 Crore in the demonetization fraud case by the Pushpak Group of companies
— ED (@dir_ed) March 22, 2022
शिवसेना नेते संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील सर्व आरोप खोडून काढले होते. श्रीधर पाटणकर यांनी देवस्थानाच्या जमिनी लाटल्या असा आरोप होतोय. पण पाटणकर यांनी देवस्थानची जमीन कशी लाटली व कधी घेतली ते दाखवा, असं आव्हानच राऊत यांनी दिलं होतं. जी जमीन दाखवली जाते. ती जमीन त्यांनी ज्यांच्याकडून घेतलीय त्यांचा व देवस्थानाचा काहीच संबंध नाही. त्यांनी 2014मध्ये जमीन कोणत्या व्यक्तींकडून घेतली त्यांच्या नावाची यादीच राऊत यांनी सादर केली होती. या यादीतील बाराव्या क्रमांकाच्या व्यक्तीकडून त्यांची जमीन घेतल्याचेही त्यांनी सांगितले होते.
राऊत यांनी आरोप फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 16 फेब्रुवारी रोजी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मी कर्जतला गेलो. तिथे चौकशी केली. श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे असून रश्मी यांचा भाऊ आहेत. ती जमीन आधी सलीमच्या नावे ट्रान्सफर झाली. हिंदू देवस्थानाची जमीन आणि मुस्लिमाच्या नावे, आणि मग पाटणकरांच्या नावावर झाली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. श्रीधर पाटणकर हे का बोलत नाहीत. श्रीधर पाटणकर याच्या नावावर जमीन सलीम याच्या नावावरुन ट्रान्सफर झाली आहे. मी तक्रार दिलेली नाही. मी फक्त जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली, असं किरीट सोमय्या म्हणाले होते.
संबंधित बातम्या: