नाशिक | 30 सप्टेंबर 2023 : आपण काय करतोय, कुठे करतोय, याचं भान आपल्याला असायला हवं. कारण भान नसलं तर आपल्या हातून नकळत काही चुकीच्या गोष्टी देखील घडू शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्टी करत असताना, अंमलात आणत असताना दहा वेळा तरी विचार करायला हवा. आपण आपल्यापुरता एखादा निर्णय घेत असू तर तो आपला वैयक्तिक मुद्दा आहे. पण आपण घराबाहेर, समाजात वावरत असताना एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती गोष्ट करण्याआधी दहा वेळा विचार करणं जास्त गरजेचं असतं. कारण त्या गोष्टीचा समाजावर काही दुष्परिणाम होणार नाही ना? याचं भान आपण निश्चितच ठेवणं अतिशय जास्त महत्त्वाचं आहे.
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपू्र्वी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जी शाळा आपल्याला माणसात आणते, मुलांमध्ये चैतन्य निर्माण करते, संस्कार लावते, विद्यार्थ्यांचं चांगलं आयुष्य घडवते, अशा शाळेच्या प्रांगणात नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीदेखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
चांगल्या गोष्टीला चांगलं म्हटलंच पाहिजे. ते म्हटलंही जातं. पण जे वाईट आहे, जे समाजाला घातक आहे, जे चुकीचं आहे त्यावर बोललंच आहे. ज्या शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांची प्रार्थना होते, त्या शाळेच्या प्रांगणात कुठल्यातरी नृत्यांगनाचे नाचगाण्याचे कार्यक्रम होणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांमध्ये किती गोंधळ, मारामाऱ्या, भांडणं, राडे, लाठीचार्ज होतो हे सगळ्यांना माहिती आहे. तिचा कार्यक्रम दुसरीकडे कुठेही आयोजित केला जाऊ शकतो. पण शाळेच्या प्रांगणात नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित होणं बरोबर नसल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे याच गोष्टीवर मंत्री दीपक केसरकर यांनी संताप व्यक्त केलाय.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुणांनी मोठी गर्दी केली होती. गौतमीचा कार्यक्रम आणि वाद हे समीकरण आहे. अशा परिस्थितीत एका जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात तिचा कार्यक्रम आयोजित झाल्यामुळे दीपक केसरकर यांनीही नाराजी व्यक्त केलीय.
गौतमी पाटीलचा डान्स जिल्हा परिषद शाळेत भरवणाऱ्यांना घरी जावं लागेल, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. दीपक केसरकर याांच्याकडून व्यक्त केली जाणारी नाराजी आणि संताप अतिशय योग्य आहे. कारण राज्यातील गाव-खेड्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्रामीण भागातील शिक्षणाच्या आत्मा आहेत. गरीब, कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं या शाळांमध्ये शिकतात. गौतमीच्या कार्यक्रमामुळे या शाळांचं नुकसान होतं. याआधी देखील एका कार्यक्रमात गौतमीच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. यावेळी एका व्यक्तीचा शाळेच्या छतावरुन खाली पडून संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
“मुलांना काय पाहिजे? बसायला चांगले बेंचेस पाहिजेत. शाळेची चांगली इमारत हवी, चांगले टॉयलेट्स हवेत. यासाठी पैसे येत असतील तर तुमचा आक्षेप काय आहे? गौतमी पाटीलला कोणी नाचवलं मला माहिती नाही. तिला शाळेच्या प्रांगणात नाचवलं तर घरी जाईल. पण याचा तुम्ही फायदा घेऊन एका चांगल्या योजनेला बदनाम करत आहात. तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? शाळेच्या गळक्या खोल्या, पडकी छपरं हे चित्र कायम महाराष्ट्रात राहिलं पाहिजे का?”, असं म्हणत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संताप व्यक्त केलाय.