सांगोल्यात आयशरची सात महिलांना धडक, पाच जणींचा जागीच मृत्यू

| Updated on: Jun 18, 2024 | 5:49 PM

सांगोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहणाऱ्या महिलांना गाडीने धडक दिल्याने पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सातही महिला शेतमजूरीचं काम करत होत्या.

सांगोल्यात आयशरची सात महिलांना धडक, पाच जणींचा जागीच मृत्यू
Follow us on

सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथील बंडगरवाडी येथे एका आयशरने सात महिलांना जागीच धडक दिल्याने त्यातील पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सांगोला तालुक्यातील कटफळ येथील काही महिला चिकमहुद येथील बंडगरवाडी येथुन कामावरून सुटल्यानंतर वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. त्या वेळेला कोळसा वाहतूक करणारा एक आयशर समोरून आला. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशर थेट महिलांना येऊन धडकला, ज्यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. वाहन चालक हा नशेत होता का याबाबत ही पोलिसांकडून तपास केला जात आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. वाहनाची धडक इतकी जोरात बसली की महिलांचा जागीच मृत्यू झाला.

शेतातून काम करुन घरी येत असलेल्या महिलांवर काळाने घाला घातला. घरातील कर्त्या महिला गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या महिला शेतमजूरी करुन आपलं घर चालवत होत्या.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तसेच स्थानिक नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर एक जण पळून गेला आहे तर एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबियांप्रती स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वीच सांगोला-पंढरपूर मार्गावर बामणी गावाजवळ देखील एका कारने अशीच तीन युवकांना धडक दिली होती. ज्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तीन मेंढपाळ युवक दुचाकीवरुन जात असताना त्यांना कारने धडक दिली होती. बिरोबा देवाची दर्शन करुन हे तिघेही युवक घरी येत असताना हा अपघात झाला होता.