नाशिकः संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई. त्या कविता लिहायच्या. हे तुम्हाला आणि मला माहित आहे. मात्र, युरोपमध्ये आठशे वर्षांपूर्वी कोणीही महिला लिहिणारी नव्हती. जे युरोपात नव्हते, देशात नव्हते, ते फक्त महाराष्ट्रात होते, असा या भूमीचा गौरवास्पद इतिहास गीतकार जावेद अख्तर यांनी नाशिकच्या साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उलगडून दाखवला आणि सारेच भारावून गेले. जावेद अख्तरांचे सगळेच भाषण खूप गंभीर आणि विशेषतः लिहित्या हातांनी ऐकावे, असेच झाले.
अख्तर म्हणाले, संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई. त्या कविता लिहायच्या. हे तुम्हाला आणि मला माहित आहे. युरोपमध्ये तर आठवर्षांपूर्वी कोणी लिहिणारी नव्हती. आठशे वर्षांची गोष्टच सोडा. फ्रान्समध्ये एक मोठी कांदबरीकार होती जॉट सेंट. पुरुषाच्या नावाने लिहायची. इंग्लंडमध्ये एक महिला जॉर्ज एलियटच्या नावाने लिहायची. मोठ्या लेखिका. मात्र, टोपण नावाने लिहायच्या. कारण स्त्री कशी काय लिहू शकते. ही दोनशे वर्षांपूर्वीची गोष्टी होती म्हणत अख्तर यांनी आपला गौरवस्पद इतिहास सांगितला. ते पुढे म्हणाले, मात्र आपल्याकडे आठशे वर्षांपूर्वीची कवयित्री आहे. आपण त्यावर गर्व करू शकतो. ब्रॉंटे सिस्टर्स. ही अठराशे-एकोणीसाव्या शतकातली गोष्टय. या तिन्ही बहिणींनी पहिल्यांदा पुरुषाच्या टोपण नावाने लिखाण केले. ही गोष्ट सगळ्यांना माहिती झाली. मी तुम्हाला दुःखाने सांगतो. कारण या लेखकांपैकी अनेकजण माझ्या पसंदीचे आहेत. त्या लेखकांनाही या बहिणींच्या लिहिण्यावर आक्षेप घेतला. तुम्हाला लिहिण्याचा अधिकार काय, असा सवाल केला, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुढे अख्तर म्हणाले, दुसऱ्यांचे सोडूनच द्या. आमच्याकडे पाहा. मुक्ताबाई होत्या. त्यानंतर बऱ्याच कालखंडाने आलेल्या बहिणाबाई होत्या. आपली मीराबाईही यांच्यापेक्षा चारशे-चाडेचारशे वर्षांपूर्वी झाल्या. मात्र, माझ्या लक्षात नाही आठशे वर्षापूर्वी हिंदुस्थानच्या कोणत्या भाषेत कवयित्री होती. हिंदुस्थानची पहिली महिला डॉक्टरही महाराष्ट्रीयन होती. ही सुद्धा आश्चर्यकारक गोष्टय. दुसऱ्या जागेपेक्षा या महाराष्ट्राच्या भूमीत नारीचा गौरव झाला, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
लोकभाषेतून बोलणारा खरा कवी
अख्तर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ज्याची इथल्या जनतेशी नाळ जोडली गेली, ज्याने इथल्या जनतेशी संवाद साधला, त्यांचा भाषेत लिखाण केले. तो खरा कवी. नुसते तत्त्वज्ञान झाडून उपयोग नसतो, असे शरसंधान त्यांनी यावेळी साधले. महाकवी तुलसीदासांनी लिहिलेले रामचरितमानस आपण आजही ऐकतो, त्यावर माना डोलावतो. तो खरा कवी. मात्र, त्यांच्यावर त्याकाळी सामाजिक बहिष्कार घालण्यात आला, याची नोंदही यावेळ अख्तरांनी केली.