‘फडणवीसांनी मला मुलीची शपथ घेऊन सांगितलेलं तुम्हाला राज्यपाल करतो’, खडसेंचा खळबळजनक दावा

| Updated on: Sep 13, 2024 | 6:26 PM

"देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की, नाथाभाऊ मी आपल्या नावाची राज्यपालपदासाठी शिफारस करतो. मी म्हटलं, देवेंद्रजी खरं सांगा. तुम्ही अनेकदा म्हणता की हे करणार, ते देणार, पण काहीच झालं नाही. त्यामुळे मला विश्वास बसत नाही. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो की, हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे", असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीसांनी मला मुलीची शपथ घेऊन सांगितलेलं तुम्हाला राज्यपाल करतो, खडसेंचा खळबळजनक दावा
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. विशेष म्हणजे फडणवीस यांनी यासाठी आपल्या मुलीचीदेखील शपथ घेतली होती. एकनाथ खडसे यांना राज्यपालपद देण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार, असा शब्द फडणवीस यांनी आपल्याला दिला होता”, असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत याबाबत भाष्य केलं आहे. खडसे यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांनी मला एक दिवस फोन केला. तुम्ही म्हणता तसं की, आमदार पंकजा मुंडे यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांनी मला बोलावलं तेव्हा त्यावेली आम्ही दोघेच होतो. देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की, नाथाभाऊ मी आपल्या नावाची राज्यपालपदासाठी शिफारस करतो. मी म्हटलं, देवेंद्रजी खरं सांगा. तुम्ही अनेकदा म्हणता की हे करणार, ते देणार, पण काहीच झालं नाही. त्यामुळे मला विश्वास बसत नाही. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो की, हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झालं ते मला माहिती नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिलं होतं. ही गोष्ट 2019 ची आहे”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

‘मी अजूनही वाट पाहतोय’

“मी ज्यावेळेस भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मला भाजपात सहभागी व्हायचं नव्हतं. दिल्लीतल भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मला बोलावलं. मी जेव्हा दिल्लीत होतो तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत माझा भाजपात प्रवेश झाला. त्यावेळेस खासदार रक्षा खडसे तिथे उपस्थित होत्या”, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. “त्यावेळेस त्यांनी माझ्या गळ्यात भाजपचा गमछा टाकला. या घटनेला आता 5 ते 6 महिने झाले, पण नंतर भाजपने माझ्या पक्षप्रवेशाची घोषणा केली नाही. मी अजूनही वाट पाहत आहे. पण अजूनही घोषणा झालेली नाही”, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

‘हे माझ्यासाठी खूप अपमानास्पद’

“मी कधीच म्हटलं नव्हतं की, मी भाजपात प्रवेश करणार. पण मला बोलवण्यात आलं होतं की, तुम्ही या म्हणून. यानंतर मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करायला गेलो. मी 40 वर्ष भाजपसोबत काम केलं. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप पक्ष पोहोचवला. एवढं सर्व झाल्यानंतरही मला पुन्हा भाजपात प्रवेश करायला सांगणं हे माझ्यासाठी खूप अपमानास्पद आहे”, अशी भावना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.