कधी काळी भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते असलेले एकनाथ खडसे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांची सून रक्षा खडसे भाजपमध्ये आहे. रक्षा खडसे यांना पुन्हा रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे पुन्हा भारतीय जनता पक्षात येणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यावेळी सोमवारी एकनाथ खडसे नवी दिल्लीत गेले. त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना अधिकच वेग आला. परंतु दिल्लीतून पोहचल्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे. तूर्त भाजपात जाण्याचा निर्णय नाही, असे सांगताना त्यांनी भविष्यातील शक्यतेची दारे उघडी ठेवली.
एखादा पक्ष सोडण्याचा निर्णय एका दिवसांत, एका क्षणात होत नसतो. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना अन् सहकाऱ्यांना विश्वासात घ्यावे लागते. त्यानंतर निर्णय घेतला जातो. त्यावेळी सध्याच्या पक्षाने आपल्याला मदत केली आहे, त्या पक्षालाही विश्वासात घ्यावे लागेल. परंतु सध्या अशी कुठलीही प्रक्रिया मी आतापर्यंत केलेली नाही. त्यामुळे आता या सर्व प्रश्नांना मला पूर्णविराम द्यावासा वाटतो, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेच जेव्हा, जेव्हा अशा विषय होईल, त्यावेळी मी त्याबद्दलची माहिती तुम्हा सर्वांना देईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाण्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले, माझ्या एका केसची सुप्रीम कोर्टाची तारीख होती. त्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. आता त्या केसची २५ तारीख मिळाली आहे. मात्र मी दिल्लीला गेलो की अनेकांशी भेटीगाठी होत असतात. मात्र, यावेळी म्हणजेच काल दिल्लीला त्या भेटी होऊ शकलेल्या नाही. माझे नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा, अमित शाह यांच्याशी वैयक्तीक संबंध होते आणि आताही आहे. यामुळे त्यांना भेटण्यासाठी आपणास कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, असे खडसे यांनी पुन्हा म्हटले.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. खडसे दिल्लीला गेल्यानंतर या चर्चेला वेग आला होता. मात्र यावर एकनाथ खडसे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून या संपूर्ण चर्चांना तुर्त पूर्णविराम दिला आहे. परंतु भविष्यातील शक्यता नाकारली नाही.