नाथाभाऊ भाजपमध्ये कधी येणार?, बड्या मंत्र्याने तारीखच सांगितली; शरद पवार गटाला मोठा धक्का?

| Updated on: Apr 06, 2024 | 8:08 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार आहेत. चार दिवसांपूर्वीच नाथाभाऊ दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा या दोन्ही नेत्यांशी एकत्रित मिटिंग केली. त्यांचे हे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाथाभाऊ भाजपमध्ये कधी येणार?, बड्या मंत्र्याने तारीखच सांगितली; शरद पवार गटाला मोठा धक्का?
एकनाथ खडसे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा घरवापसी करणार आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार आहेत. चार दिवसांपूर्वीच खडसेंनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे खडसे यांचा भाजपमधील मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, खडसे कधी येणार अशी चर्चा आता रंगली आहे. या चर्चेला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तरही दिलं आहे. नाथाभाऊ हे येत्या 8 किंवा 9 एप्रिल रोजीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका सभेत बोलताना ही माहिती दिली आहे. सुबह का भुला, शाम को घर पे वापस आ गया. बघा तिकडे गेलेला माणूस, आमदार झालेला माणूस हा पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय. मूळ विचारधारेमध्ये येतोय. एकनाथ खडसे पुन्हा 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, बघा राजकारणारत कसं चाललंय?, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

त्यांचं स्वागत करू

आपल्याकडे कुणी नवीन कार्यकर्ता आला तर राग येतो. हा आला तर कसं होईल? असं आपण त्या कार्यकर्त्याच्याबाबत विचार करतो. पण बघा तिकडे गेलेला माणूस, आमदार झालेला माणूस हा पुन्हा भाजपमध्ये येतोय. मूळ विचारधारेत येतोय. आम्ही त्यांचे स्वागत करू. मूळ विचारधारेत येत असल्याने जिल्ह्यात त्यांचं निश्चित स्वागत होईल, असं पाटील म्हणाले.

चंद्रपूरच्या सभेत प्रवेश?

विदर्भातून ते खानदेशात येणार आहेत. जिल्ह्यात भाजपचे जुने कार्यकर्ते म्हणून त्यांचे ओळख होती. मंत्री म्हणून ओळख होती. मात्र त्यांनी विचारधारा सोडल्यामुळे बऱ्याच वेळा टीका सुद्धा केली. मात्र आता मागच्या काळात जे झालं ते आम्ही आता विसरून जाऊ आणि नव्याने अध्याय सुरू करू, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानामुळे एकनाथ खडसे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर येथील सभेतच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं

दरम्यान, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही खडसे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा घरवापसीचा विचार सुरू होता. खडसे भाजपमध्ये येतील हे मी वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं. पण मला यावर अधिक बोलता येणार नाही. ते जेव्हा प्रवेश करतील तेव्हा मी त्यावर बोलेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महायुतीला फायदा होईल

मुक्ताईनगरच्या जागेबाबतही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी इथला विद्यमान आमदार आहे. त्यामुळे काही होणार नाही. खडसे महायुतीत आल्यास त्याचा फायदा महायुतीला होईल. लोकसभेची जागा निवडून आणण्यासाठी त्यांचा फायदा होईल. त्यांचा दांडगा अनुभव आहे. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात विकासाचं प्रचंड काम केलंय. त्या कामाच्या व्हिजनवर आकर्षित होऊन नाथाभाऊ भाजपमध्ये येत असतील, असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढला.