‘एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन स्वाक्षरी केली?’, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर नारायण राणे यांचा धक्कादायक दावा

| Updated on: Dec 22, 2022 | 8:57 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत नागपूरच्या एनआयटी भूखंड घोटाळ्या प्रकरणी गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन स्वाक्षरी केली?, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर नारायण राणे यांचा धक्कादायक दावा
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी विरोधकांवरच निशाणा साधला. “तुम्ही नीट वाचलं का? पाहिलं का? ते भूखंड रितसर दिले असताना त्यावेळी हे सत्तेत होते. तेव्हा हे झोपले होते का? प्रकरण का नाही काढलं?”, असे प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले.

“याआधी नगरविकास मंत्री म्हणून शिंदे होते. त्यांनी अनेक प्रकरण यांच्या (उद्धव ठाकरे) सांगण्यामुळे सही केले होते. फक्त सांगण्यामुळे शिंदेंनी स्वाक्षरी केलीय”, असा दावा नारायण राणे यांनी केला.

“तेव्हा खोके नव्हते का? माचिसची छोटी पेटी दिली का?”, अशीदेखील टीका नारायण राणे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत नागपूरच्या एनआयटी भूखंड घोटाळ्या प्रकरणी गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत गोंधळ घातल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या विषयावर सभागृहात चर्चा होणार नाही, अशी भूमिका मांडली होती.

त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला होता. तसेच सभागृहातून बाहेर आल्यावर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. याच आरोपांबद्दल नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.

‘मातोश्रीची झोप उडालीय’

“ठाकरेंनी अनेक भ्रष्टाचार पचवायचा प्रयत्न केला. आता सगळं बाहेर येणार. ग्रामपंचायत निवडणुकीत उडालेला धुव्वा, मोर्चाचा फज्जा आणि आता दिशा सालियन प्रकरणी एसआयटी लावल्यामुळे मातोश्रीची झोप उडाली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे”, असा दावा नारायण राणे यांनी केला.

“आतापर्यंत ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीवर जे आरोप झाले त्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. ना उद्धव बोलत, ना आदित्य बोलत. काय बोलतोय पिल्लू? भडभड बाहेर येतो, मीडिया ऐकते म्हणून घणाघात, अरे काय त्याचा घणाघात? एक विषय माहिती नाही. कशाचा अर्थ कुणालाही लावतो. त्यामुळे आदित्य ठाकरे सुशांत आणि दिशा सालियनच्या केसमध्ये आरोपी आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केला”, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला.

“तो काय व्यवहार झाला मला माहिती आहे. दिशाच्या आई-वडिलांना कुठे बोलावण्यात आलं, कुठे ठेवण्यात आलं, हे मला माहिती नाही. हत्या झाल्यानंतर कुटुंबाने सांगितलं आमचा संबंध नाही तरीसुद्धा संपत का? हत्या म्हणजे हत्या. खून. कलम 302. हे आता नको ते मुद्दे नका काढू”, असं राणे म्हणाले.

“एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं सुद्धा म्हणणं आहे की, आदित्य ठाकरे हत्येच्या वेळी त्या ठिकाणी होता. वेळ आल्यावर त्या अधिकाऱ्याचं सुद्धा नाव सांगेन”, असंदेखील ते म्हणाले.