राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यनमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती. या चर्चेबाबत ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. शिंदे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भेटीमागचं कारण सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी सुरु आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी काहीतरी काय सुरु आहे? असा उलटसवाल केला. काहीतरी काय सुरु आहे हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय या अशा चार पक्षांची आमची महायुती आहे. आम्ही ही महायुती मजबुतीने पुढे नेत आहोत. इतर कुणाचा विचार करण्याची आवश्यकता काय?”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी चालू असेल तर मला माहिती असेल ना? त्यांना माहिती असेल तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. माझ्याकडे काहीच चालू नाही. मी सरळ महायुती म्हणून काम करतोय. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय. मला खात्री आहे की, या निवडणुकीत महायुती पूर्णपणे बहुमताने जिंकेल. एवढा विचार करण्याची गरज काय? आमची आणि भाजपची विचारधारा एक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेला दुसरा कोणता विचार करण्याची आवश्यकता नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी एकनाथ शिंदेंना शरद पवार त्यांना का भेटून गेले? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “काही लोकं लपूनछपून भेटतात. आम्ही ते करत नाही. ते स्वत: इकडे आले होते. ते स्वत: सह्याद्री अतिथीगृहाला भेटले होते आणि मुख्यमंत्री असल्याने सगळ्या पक्षाचे लोकं मला भेटतात. काँग्रेसचे भेटतात, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भेटतात. त्यावेळेस राज्यातील काही प्रश्न होते. ते प्रश्न घेऊन शरद पवार माझ्या भेटीला आले होते. त्याबाबत चर्चा करायला ते अनेकवेळा आले आहेत. याबाबत राजकीय अर्थ काढण्यात अर्थ नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे काही विषय घेऊन जायचे असतील तर त्यात गैर काय?”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
यावेळी एकनाथ शिंदे यांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. एकनाथ शिंदे आणि शरद पवार परस्परांवर टीका का करत नाहीत? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं आहे. आज जे सुरु आहे. राजकारण किती खालच्या स्तरावर गेलेलं आहे. हे तुम्हाला उबाठाकडून पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. आमचे संस्कार आहेत. आम्ही कामाला प्राथमिकता देतोय, आरोपांना नाही. आरोप करणे हे लोकांना आवडत नाही. तुमच्याकडे काय आरोप आहेत? दोन-चार ठरलेली आरोप आहेत. तुम्ही काय केलं ते सांगा. काय करणार ते सांगा. तुम्ही अडीच वर्षात सर्व बंद पाडलं. आता पुन्हा म्हणतात हे बंद पाडू ते बंद पाडू. खूप गोंधळेली अवस्था आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे अशा मानसिकतेतून ते अशाप्रकारचे आरोप करत आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.