महाराष्ट्र सरकारने राज्यभरात दीड लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेसाठी राज्यभरात लाखो महिलांकडून अर्ज केले जात आहेत. पण काही ठिकाणी महिलांना अर्ज करताना अडचणी येत आहेत. या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने आता मोठं पाऊल उचललं आहे. सरकार आता लाडकी बहीण योजनेचं काटेकोर पालन व्हावं यासाठी पूर्ण लक्ष केंद्रीत करणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी 2 समित्या स्थापन केल्या आहेत. ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी सरकारकडून दोन समित्या स्थापन गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्या आता अंमलबजावणीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 83 हजार 468 ऑफलाईन आणि ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी दिली. जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण आणि शहरी भागात अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन केले आहेत. आवश्यक कागदपत्रांविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांकडून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यांनतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलैपासून दरमहा दीड हजार रुपये जमा होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप आहे. अंगणवाडी तसेच सेतू केंद्र तसेच तहसील कार्यालयात येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रमाधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात सहा वर्षाच्या खालील बालकांना पोषण आहार वाटप, शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच गरोदर महिलांचे लसीकरण, त्यांना पोषण आहार देणे, गावात आरोग्यविषयक शिबिर असल्यास मदत करणे, आदी कामांचा बोजा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर असतानाच शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची जबाबदारी देखील ह्या अंगणवाडी सेविकांना सोपविली आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी गोंधळून गेले आहेत.
अंगणवाडी सेविकेला १० हजार ५०० रुपये, तर अंगणवाडी मदतनिसाला ५ हजार रुपये मानधन दिले जाते. एवढ्या मानधनात घरखर्च भागविणे कठीण आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी ५० रुपये व्यतिरिक्त्त देणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र ५० रुपये कमी असून मानधन वाढवावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांद्वारे करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक बहीण योजनेचा अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. शहरात लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना सर्वर डाऊन तर ॲप संथ गतीने सुरू आहे. सर्वर डाऊन झाल्याने अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणी त्रस्त आहेत. नाव नोंदणीसाठी बराच वेळ उभे राहावे लागत आहे. बऱ्याच ठिकाणी महिलांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.
बीड जिल्ह्यातील 15 ते 26 जुलै दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रभाग निहाय नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या विशेष कॅम्पेनचे आयोजन करण्यात आलेले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेला आहे.
राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य आणि पोषण तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला, मुलींना दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहे. या योजनेचे चंद्रपूर जिल्ह्यात ऑफलाइन आणि ऑनलाइन मिळून ३९ हजार ३६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये महिना आता पक्का झाला आहे.
‘माझी लाडकी बहिण’ योजनेचे नागपुरात ८४ हजार ८८४ अर्ज जमा झाले आहेत. नागपूर महानगरपालिकेने प्रभागनिहाय केलेल्या अर्ज स्वीकृत केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनपाच्या प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रात सुटीच्या दिवशीही अर्ज स्वीकारले जातात. रक्षाबंधन पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ॲागस्टचे पैसे मिळणार आहेत. प्रशासनाकडून जास्तीत जास्त महिलांनी अर्ज भरण्याचं आवाहन केलं जात आहे.
राज्यात महत्त्वकांक्षी अशी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या घोषणेंतर्गत विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या १५०० रुपयांपेक्षा जास्त आर्थिक योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जिल्ह्यातील सरासरी १६ हजार निराधार योजनेतील महिलाही या लाडकी बहीण योजनेला आता मुकणार आहेत. संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत या निराधार महिलांचा समावेश आहे. तर काही महिलांना वयाची अडचण देखील येत असून या महिला लाभापासून वंचित राहणार आहेत.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालघर जिल्ह्यातून आतापर्यत १ लाख ११ हजार ७९२ महिलांनी अर्ज नोंदणी केले आहे. जिल्ह्यातील संभाव्य पात्र महिलांची संख्या सुमारे 3 लाखांच्या जवळपास आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील जवळपास तब्बल 37 टक्के महिलांनी अर्ज नोंदणी केली आहे.