शिंदे गटाच्या मंत्र्याची पुन्हा उद्धव ठाकरे यांना साद? शिवसेना एकजूट करण्याचे संकेत, महाराष्ट्रात पुन्हा मोठं काहीतरी घडणार?

| Updated on: Jan 08, 2023 | 4:16 PM

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन सहा महिने उलटले तरी राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाहीय. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन शिंदे गटाच्या आमदारांमध्ये कुजबूज सुरु झाल्याचं चित्र आहे.

शिंदे गटाच्या मंत्र्याची पुन्हा उद्धव ठाकरे यांना साद? शिवसेना एकजूट करण्याचे संकेत, महाराष्ट्रात पुन्हा मोठं काहीतरी घडणार?
Follow us on

गुरुप्रसाद दळवी, Tv9 मराठी, सिंधुदुर्ग : शिवसेना पुन्हा एकजूट होऊ शकते का? असा प्रश्न अनेकांना पडतोय. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या घडामोडी पाहिल्या तर कदाचित नाही असं उत्तर असू शकतं. पण तरीही शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांचे विधानं ऐकली तर शिवसेना एकजूट होणं हे सध्याच्या घडीला कठीण असलं तरी अशक्य असं नाहीय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दीपक केसरकर यांनी दोन आठवड्यांपूर्वी एक महत्त्वाचं विधान केलं होतं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं. शिवसेना एकजूट व्हायला वेळ लागणार नाही, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं होतं. या विधानावरुन विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण या चर्चा संपत असतानाच दीपक केसरकर यांनी आज पुन्हा तसंच आणखी एक वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा शिवसेना एकजूटीच्या चर्चांना उधाण आलंय.

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हं आहेत. कारण पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यातील मोठमोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचाली सुरु आहेत. पण असं असताना शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात त्या पलीकडे जाऊन काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन सहा महिने उलटले तरी राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाहीय. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन शिंदे गटाच्या आमदारांमध्ये कुजबूज सुरु झाल्याचं चित्र आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना पक्षाचं चिन्ह कुणाचं याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. ही सुनावणी 10 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोग शिंदे आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदार आणि खासदारांची ओळखपरेड करणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टात या संबंधित महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाला दिलासा मिळाला तर राज्यातील पुढच्या काही दिवसांमधील घडामोडी वेगळ्या मार्गाला गेलेल्या असतील. पण त्याआधीच शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र आले तर आणखी वेगळं काही घडू शकतं. पण या जर-तरच्या गोष्टींना राजकारणात काहीच महत्त्व नसतं.

अशा परिस्थित दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना सोबत येण्यासाठी ठेवलेल्या अटी या कोणत्या राजकीय घडामोडींकडे घेऊन जातात ते आगामी काळात स्पष्टच होईल.

“भविष्यात उद्धव ठाकरेंना आमच्यासोबत यायचं असेल तर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मनं जिंकायला हवी”, अशी अट दीपक केसरकर यांनी ठेवली आहे.

“उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांना सल्ला देणे एवढा मोठा मी नेता नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांना शिवसेनेची विचारधारा जुळवून घेता येत नाही. त्यामुळे शिवसेना संपविण्याचा घाट शरद पवार यांनी घातला”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

“सहानुभूतीवर पक्ष चालवता येत नाही. तो पक्ष काही काळच चालतो”, असा टोलादेखील दीपक केसरकर यांनी यावेळी लगावला.

दीपक केसरकर आणखी काय म्हणाले?

“उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं महत्त्व कमी होतंय कारण ते चुकीच्या रस्त्याने गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शिवसेना संपवायची होती. म्हणूनच ते तिन्ही पक्ष एकत्र घेऊन लढत आहेत”, असं दीपक केसरकर म्हणाले.

“मराठी माणसाच्या विरुद्ध, हिताच्या विरुद्ध, त्यांचा विचार सोडून तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाता, तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महत्त्व कमी होते”, असा दावा केसरकरांनी केला.

“शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेले वक्तव्य हे 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आहे. 26 जानेवारीला झेंडावंदन करण्यासाठी पालकमंत्री त्या त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केलं असावं. मात्र अध्याप तरी मला मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात काहीही माहित नाही”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

“अडीच-अडीच वर्ष कार्यालयात जात नसाल तर तुम्ही काय कामे करणार? उद्धव ठाकरे यांचं आम्ही समजू शकतो. मात्र आदित्य ठाकरे का जात नाहीत? याच उत्तर जनतेला द्यावी लागतील”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.