गुवाहाटी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार आज गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. सर्व आमदारांनी गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेतलंय. या दौऱ्यादरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांना विरोधकांकडून कामाख्या देवीला 40 रेड्यांचा बळी देण्याच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी विरोधकांचं ताळतंत्र बरोबर नाही. ते ठीक करण्यासाठीच आम्ही गुवाहाटीला आल्याचं किशोर जोरगेवार म्हणाले.
“आम्ही तंत्रमंत्र करायला चाललोय, असंही विरोधक म्हणत होते. पण सध्या महाराष्ट्रातील काही लोकांचे ताळतंत्र बरोबर नाहीय. ते ठीक करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत”, असा घणाघात किशोर जोरगेवार यांनी केला.
“आज इथे येण्याचा आनंद वेगळा आहे. पु्न्हा एकदा मातेचं दर्शन घेतलंय. महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आणि देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलोय”, असं आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
“आम्ही मागे परिवर्तनासाठी आलो होतो. आता तोच नवस फेडण्यासाठी आम्ही आलोय, असं म्हणायला हरकत नाही”, असंही ते म्हणाले.
“आमच्या गुवाहाटी दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं काही नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल गेल्या काही दिवसांपासून चालू होतं”, असं देखील ते म्हणाले.