उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. अतिशय निर्घृणपणे हत्या झाली आहे. शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सीआयडी, एसआयटी लावलेली आहे. यातील एकही आरोपी सुटणार नाहीत. कोणाशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणाला पाठीशी घालणार नाही. आरोपींना फाशी सारखी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली जाणार आहे. फास्टट्रॅकवर हा खटला चालवला जाणार आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतले. एखाद्या सरपंचाची निर्घृण हत्या होते हे अत्यंत दुर्दैवी आहे. संतोष देशमुख प्रकरणात सीआयडी चौकशी चालू आहे. या तपासात कोणीही सुटणार नाही”, अशी महत्त्वाची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
खासदार संजय राऊत यांनी आमचा कम्युनिकेशन गॅप झाला. त्यामुळे आधीची युती तुटली असं विधान केलं होतं. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत त्यांना आता आठवण झाली का? असा सवाल केला. “बैल गेला आणि झोपा केल्या अशी अवस्था झाली आहे. तेलही गेलं आहे आणि तूपही गेलं आहे. पुढचं मी काही बोलत नाही. उपरती लवकर सुचली. 2019 च्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने क्लिअर माईंडेड मतदान केलं होतं. पण काहींनी स्वार्थासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. त्यांना स्मारकाकडे निमंत्रण देणार नाही. स्मारक हे शासन बनवत आहे. बाळासाहेब हे एकट्याचे नाहीत. लोकनेते म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांचे धोरण होते. ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना विधानसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला. आता काय बोलून त्याचा उपयोग. जो बुंद से गई वो हौद से नही आती”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत आले तर स्वागत करू, असं भाजप नेते म्हणत आहेत. यावर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं शिर्डीतील भाषण ऐकण्याचा सल्ला दिला. “प्रत्येक जण काम करणारे मंत्री आहेत. हे मंत्री फेसबुकवाले नाहीत. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले. तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. एवढे निर्णय कधी झाले आहेत का? ही सर्व महायुतीच्या कामाची पोचपावती आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबतही प्रतिक्रिया दिली. “लाडक्या बहिणींची योजना आहे तशी चालू राहायला पाहिजे. सर्व विरोधक योजना फक्त चुनावी जुमला आहे, असा आरोप करत आहेत. आता पाच-सहा हप्ते झाले. विरोधक खोटा प्रचार करत आहेत”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. “ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना धमकीचे फोन येत आहेत. कुणाला अशा प्रकारची धमकी आली असेल तर शेवटी सरकार म्हणून त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असेल”, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.