एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील तरुण खासदाराला बेळगावात प्रवेशबंदी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता कुठपर्यंत जाणार?

| Updated on: Dec 18, 2022 | 5:33 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या तरुण खासदाराला बेळगावात जाण्यास बंदी घालण्यात आलीय.

एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील तरुण खासदाराला बेळगावात प्रवेशबंदी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता कुठपर्यंत जाणार?
Follow us on

कृष्णा सोनारवाडकर, कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात जाण्यास बंदी घालण्यात आलीय. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीने एक मेळावा आयोजित केलाय. या मेळाव्यासाठी धैर्यशील माने जाणार आहेत. पण त्यांना या कार्यक्रमासाठी जााण्यास मज्जाव करण्यात आलाय. धैर्यशील माने या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांना बेळागावात जाण्याची परवानगी नाकारण्यात आलीय. धैर्यशील माने हे सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत.

कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन बेळगावात पार पडणार आहे. या अधिवेशनाचा निषेध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यासाठी धैर्यशील माने बेळगावात जाणार होते. पण त्याआधीच त्यांच्यावर बेळगावात बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा तणाव ताजा आहे. बेळगावात कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरुय. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात तुमच्याकडून काही वादग्रस्त भाष्य झालं तर पुन्हा दोन्ही राज्यात नवा वाद निर्माण होईल. त्यामुळे तुमच्यासाठी बेळगावात प्रवेशबंदीचा आदेश देण्यात येतोय, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे धैर्यशील माने हे बेळगावात जाण्यावर ठाम आहेत. आपण कर्नाटक सरकारला येत असल्याची माहिती दिलीय. त्यामुळे मी जाणार आहे. संबंधित दौरा हा शक्तीप्रदर्शनासाठी नाही, असं धैर्यशील माने म्हणाले आहेत. दरम्यान, प्रशासनाचा त्यांच्या दौऱ्याला विरोध असल्याने धैर्यशील माने खरंच बेळगावात जाऊ शकतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.