मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेनं (Shiv Sena) आपला मोर्चा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडे (Sanjay Raut) वळवल्याचं दिसतंय. संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन, राऊतांची उचलबांगडी करण्यात आलीय. त्यामुळं आता व्हीप काढून अपात्रतेची रणनीती आहे का ? अशी चर्चा सुरु झालीय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना हा पहिला धक्का दिल्याचं मानलं जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन राऊतांनी उचलबांगडी केलीय. राऊतांच्या ऐवजी गजानन किर्तीकरांची नियुक्ती करण्यात आलीय. तसं पत्रच शिवसेनेनं लोकसभा सचिवांना दिल्याचं खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलंय. लोकसभा सचिवांनी मान्यता दिल्यावर, किर्तीकर शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते होतील.
महाराष्ट्र विधीमंडळ असो की संसद शिवसेना पक्ष हा एकच आहे. आणि सध्या शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंकडे आहे. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेकडून किर्तीकर संसदेत व्हीप काढू शकतात. म्हणजेच किर्तीकरांचा व्हीप राऊतांनी न पाळल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अपात्रतेची कारवाई झाल्यास राऊतांची खासदारकीही जाऊ शकते.
संसदेत शिवसेनेच्या खासदारांचा विचार केला तर लोकसभेत एकूण 18 खासदारांपैकी शिंदेंच्या शिवसेनेसोबत 13 खासदार आहेत. तर ठाकरे गटासोबत 5 खासदार आहेत. राज्यसभेत एकूण 3 खासदार आहेत. तिन्ही ठाकरे गटाकडे आहेत. शिंदेंच्या बंडाचं कनेक्शन आधी राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीशीच जुळलं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत राऊतांना एक जरी मत कमी पडलं असतं तरी, संजय राऊत पराभूत झाले असते.
महाविकास आघाडीचे 4 उमेदवार होते. विजयासाठी 41 मतांचा कोटा होता. संजय राऊतांना 41 मतं पडली, एक जरी मत कमी झालं असतं तरी राऊत पराभूत झाले असते. विशेष म्हणजे विधानसभेत स्वत: शिंदेंनी किस्साही सांगितला होता. शिंदेंच्या शिवसेनेनं राऊतांना पहिला धक्का तर दिलाच आहे. आता व्हीप आणि पात्र-अपात्रतेसंदर्भातल्या गोष्टी पुढे स्पष्ट होतील.