महायुतीने आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. शिवसेना आणि राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांना समर्थन देत असल्याचं पत्र दिलं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आज आम्ही राज्यपालांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. उद्या आझाद मैदानात शपथविधी होईल. मला आनंद आहे की, अडीच वर्षापूर्वी इथेच देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यंमत्री व्हावे म्हणून शिफारस केली होती. शिवसेनेने आधीच भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. आमचा पूर्ण पाठिंबा आणि समर्थन असेल अशी भूमिका मी आधीच मांडली होती. खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर मतांचा वर्षाव केला आहे. महायुतीला मोठा विजय मिळाला. आम्ही टीम म्हणून काम करत होतो. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळेल यासाठी आम्ही काम करत होतो. राज्य चालवतांना अनेक निर्णय आम्ही घेतले.’
‘शेवटी सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी असतं. एकीकडे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली. सरकारची जबाबदारी म्हणून आम्ही ती पार पाडण्याचा प्रयत्न केला. राज्याला पुढे नेण्यासाठी डबल इंजिनचं सरकार आम्ही चालवलं. राज्यातील जनतेने देखील त्याची पोहोचपावती आम्हाला दिली.’
‘आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. टीम म्हणून आम्ही पुन्हा काम करणार आहोत. आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या कल्याणकारी योजना आल्या नव्हत्या. त्याची आम्ही अंमलबजावणी केली. सर्वसामान्यांचं हे सरकार आहे ते आम्ही राबवलं याचं समाधान आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा शुभेच्छा देतो.’ असं ही शिंदे म्हणाले
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ‘आमच्यात कोण मोठा कोण छोटा असं काही नव्हतं. आम्ही एकत्र काम करत होतो. सरकार सर्वसामान्यांसाठी असतं. आम्ही त्याचं पालन केलं. आम्ही विकास आणि योजना याची सांगड घातली.’
मी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे अशी विनंती केली. सर्व आमदारांची अशी इच्छा आहे. मला विश्वास आहे की त्यांच्याकडून सकारात्मक विचार होईल. आम्ही तिन्ही मिळून आणि इतर पक्षांना सोबत घेऊन निर्णय घेऊ आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. महाराष्ट्राला दिलेले वचन आम्ही पूर्ण करु. मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. की त्यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला नेतृत्व करण्याची संधी दिली. मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, रामदास आठवले यांचे आभार व्यक्त करतो. मी महाराष्ट्रात एक चांगले सरकार देईल असे मी विश्वास देतो.