मुंबई- शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी मुख्यमंत्री व्हावे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी त्यांना टिळा लावावा, उद्धव यांच्या आशीर्वादाने हे सर्व घडावे. असे आवाहन बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी केले आहे. आपल्याकडे जास्त संख्याबळ असल्याने तीच शिवसेना आहे, असा दावा शिंदे गटाने दुपारीच केलेला आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने हे सर्व घडावे, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेना-भाजपा युती व्हावी, असे दीड वर्षांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगत होतो, असेही केसरकर यांनी सांगितले आहे. उदधव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. उद्धव यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, असेही केसरकर म्हणाले आहेत. दुसरीकडे या बंडखोरीशी भाजपाचा काहीही संबंध नाही, असे सांगणाऱ्या भाजपाने पहिल्यांदाच कोअर कमिटीनंतर याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे. या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, मात्र सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेले आहे. बंडखोर असा उल्लेख न करता शिवसेनेने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नसल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. अशा स्थितीत आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर तीन शक्यता कोणत्या आहेत, त्या पाहुयात
हा पहिला पर्याय आहे. यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि भाजपाचा उपमुख्यमंत्री होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यात पुढाकार घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर, हा निर्णय होऊ शकतो. मात्र राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेला १०६ आमदार असलेला भाजपा हा निर्णय किती घेईल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, मात्र या सरकारला भाजपा बाहेरुन पाठिंबा देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल. पुढच्या अडीच वर्षानंतर निवडणुकांना सामोरे जात पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येण्यासाठी भाजपा हा प्रयोग करु शकेल अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.
उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबतचे महाविकास आघाडीचेच सरकार राहील. याचे संकेत शरद पवार यांनी यापूर्वीच दिले आहेत. उद्धव ठाकरेंनीही याचे भावनिक आवाहन केले आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि आघाडीचे सरकार कायम राहील, अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.