महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या निवडणुकीचा धुराळा, बड्या नेत्यांचं भवितव्य काय? राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर

| Updated on: Jan 29, 2024 | 3:33 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील काही दिग्गज नेत्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ आता लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झालीय. या निवडणुकीत नारायण राणे, प्रकाश आंबेडकर आणि इतर नेत्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी मिळते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या निवडणुकीचा धुराळा, बड्या नेत्यांचं भवितव्य काय? राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर
Follow us on

नवी दिल्ली | 29 जानेवारी 2024 : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. या सर्व 56 जागांवरील खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल 2024 ला संपणार आहे. त्यापूर्वी 27 फेब्रुवारीला या 56 जागांसाठी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीचा तारीख जाहीर झाली आहे. या निवडणुरीची अधिसूचना 8 फेब्रुवारी 2024 ला निघेल. तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. तसेच अर्जाची छाननी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. राज्यसभेच्या या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी 2024 सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील ज्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे तिथे सध्या ठाकरे गटाचे अनिल देसाई, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण हे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला राज्यसभेचं सदस्य आणि खासदार म्हणून पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या या 6 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीला सर्वच पक्षांकडून कुणाकुणाला उमेदवारी दिली जाते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

‘या’ दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपणार

विशेष म्हणजे देशातील 9 केंद्रीय मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आता पूर्ण होत आहे. यामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, आयडी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (कर्नाटक), शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (मध्य प्रदेश), आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (गुजरात), पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (राजस्थान) यांचा समावेश आहे.

एकूण 15 राज्यांमधील 56 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओदिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे.