केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना चिन्हं बहाल केली जात आहेत. आतापर्यत समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि प्रहारचे एकमेव आमदार दिनेश बूब यांना निवडणूक आयोगाकडून चिन्हं बहाल करण्यात आले आहेत. महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांना ‘शिट्टी’ चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ यांनी चिन्ह बहाल करण्याच्या प्रक्रियेत जाणकारांना तीन चिन्हांपैकी शिट्टी हे चिन्ह बहाल केलं आहे. महादेव जानकर यांचा सामना महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय बंडू जाधव यांच्या मशाल चिन्हासोबत असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा पर्याय दिला होता. या चिन्हांमध्ये पहिल्या पसंतीचं चिन्ह म्हणून शिट्टी चिन्ह मागितलं होतं. तर दुसऱ्या पसंतीच्या चिन्हासाठी सफरचंद या चिन्हाची आणि तिसऱ्या पसंतीचं चिन्ह म्हणून रोड रोलच चिन्ह मागितलं होतं. यानंतर निवडणूक आयोगाने जानकर यांच्या पहिल्या पसंतीचं चिन्ह मान्य केलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक आयोगाकडून चिन्हाचं वाटप करण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्हं देण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत. ते वंचितचे उमेदवार आहेत. त्यांना निवडणूक आयोगाकडून ‘प्रेशर कुकर’ चिन्हं देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना प्रेशर कुकर या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रे यांच्याविरोधात सामना होणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांना शिट्टी चिन्हं मिळालं आहे. दिनेश बूब हे अमरावतीचे प्रहारचे उमेदवार आहेत. अमरावतीत महायुतीकडून सध्याच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा या कमळच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांचा उमेदवारी देण्यात आली आहे. ते काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातही तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.