बाबा सिद्दीकींच्या हत्येची गंभीर दखल; निवडणूक आयोगाचे पोलीस आणि प्रशासनाला आदेश काय?

| Updated on: Oct 15, 2024 | 5:52 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याची हत्या झाली आहे. या घटनेची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

बाबा सिद्दीकींच्या हत्येची गंभीर दखल; निवडणूक आयोगाचे पोलीस आणि प्रशासनाला आदेश काय?
बाबा सिद्दीकींच्या हत्येची गंभीर दखल; निवडणूक आयोगाचे पोलीस आणि प्रशासनाला आदेश
Follow us on

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होईल. तर झारखंडला 13 आणि 20 अशा दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार असल्याचं राजीव कुमार यांनी जाहीर केलं. निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्यानंतर आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. पण आचारसंहितेपूर्वीच महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी निवडणूक काळात हिंसाचाराची कोणतीही घटना घडू नये यासाठी पोलीस आणि प्रशासनाला आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं.

“आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही स्पष्ट सांगतो, पोलीस आणि प्रशासनाला सांगतो, कोणत्याही प्रकारची हिंसा आणि गुन्हेगारी होता कामा नये. आम्ही सख्त सूचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारची हिंसा आणि कोणत्याही प्रकारचा हल्ला कोणत्याही राजकीय नेत्यावर होता कामा नये”, अशी प्रतिक्रिया मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

रश्मी शुक्ला यांच्या प्रश्नावर निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

यावेळी निवडणूक आयुक्तांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. निवडणूक असल्याने रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवावे. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, अशी काँग्रेसची मागणी आहे. याबाबत निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं. “महासंचलाकांची नियुक्ती ही यूपीएससी करते. सीनिअर व्यक्तीला पद दिलं जातं. ही नावे यूपीएससीकडून जाहीर केली जाते”, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

तुतारी आणि पिपाणी चिन्हावर निवडणूत आयोग काय म्हणालं?

यावेळी निवडणूक आयुक्तांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी आणि पिपाणी चिन्हाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. यावेळी पिपाणी चिन्ह फ्रीज करणार आहात का? तशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाने केली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राजीव कुमार यांनी उत्तर दिलं. “शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 2 मागण्या केल्या होत्या. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे ते मोठं करण्याची पहिली मागणी त्यांनी केली होती. दुसरी मागणी त्यांनी ट्रम्पेट फ्रीज करण्याची केली होती. आम्ही पहिली मागणी मान्य केली आहे. आम्ही त्यांना लिखित स्वरूपात विचारल होत की, तुमचं चिन्ह कसं असाव ते सांगा. त्यांनी दिलेल्या आकारातील पाहिला आकार आम्ही मान्य केला आहे. पिपाणी चिन्ह पूर्ण वेगळं आहे. त्याला आम्ही हात लावला नाही”, असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं.