संदीप राजगोळकर, Tv9 प्रतिनिधी, नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला नवं नाव देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शरद पवार गटाकडून तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार अशा तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या नावाला मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत मर्यादीत असणार आहे.
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला देण्यात आलेलं नवं नाव हे येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर शरद पवार गटाला पुन्हा पक्षाच्या नावासाठी तीन नावांचा प्रस्ताव पाठवावा लागेल. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नाव देताना एक दिलासा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव मिळालं आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाच्या नावातही राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अबाधित असणार आहे. फक्त या नावापुढे शरदचंद्र पवार असं जोडण्यात आलं आहे.
निवडणूक आयोगाचा निकालानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार या नावातच वजन असल्याचं म्हटलं होतं. शरद पवार गटाच्या सर्व नेते, पदाधिकाऱ्यांकडून हेच मत मांडण्यात आलं होतं. त्यानुसार निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नावांमध्ये शरद पवार हे नाव होतं. अखेर निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या गटाला आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार अशा नावाला मान्यता देण्यात आली आहे. याआधी शिवसेनेच्या बाबतही असाच निर्णय समोर आला होता. ठाकरे गटाला देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं होतं.
निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयावर अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही निवडणूक आयोगाची जजमेंट वाचली तर त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, राज्यसभेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे आणि 8 तारखेपासून नोटीफिकेश आहे, म्हणून त्यांनी वन टाईम हे नाव दिलं आहे. हे तात्पुरतं आहे. त्यांना 27 तारखेनंतर पुन्हा अर्ज करुन नवं नाव आणि चिन्हं मागावं लागणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.