अरे देवा! मंत्री आले आणि बत्ती गुल, मोबाईलची टॉर्च लावून आढावा बैठक

| Updated on: Sep 21, 2023 | 8:06 PM

गडचिरोलीत एक विचित्रप्रकार घडला. मंत्री आढावा बैठकीसाठी आले. पण त्यांची बैठक सुरु असताना अचानक बत्ती गुल झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांची देखील तारांबळ उडाली. संबंधित घटनेची आता जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

अरे देवा! मंत्री आले आणि बत्ती गुल, मोबाईलची टॉर्च लावून आढावा बैठक
Follow us on

गडचिरोली | 21 सप्टेंबर 2023 : राज्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या घटना घडतात. अनेक ठिकाणी तासंतास वीजेचा पुरवठा खंडीत झालेला बघायला मिळतो. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दहा तासांपेक्षा जास्त काळ वीज नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. उन्हाळ्यात कडाक्याचं ऊन पडलेलं असतं आणि दुसरीकडे वीज गेली असेल तर सर्वसामान्य नागरिकांना काय यातना होतात ते आपण शब्दांमध्ये सांगू शकणार नाहीत. सर्वसामान्यांच्या याच यातना आज एका मंत्री महोदयांना भोगाव्या लागल्या आहेत. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होऊ लागलेली आहे.

संबंधित घटना ही अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत घडली आहे. अचानक कार्यक्रमात वीज गेल्याने ते प्रचंड संतापले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनादेखील फैलावर घेतलं. विशेष म्हणजे विजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठीच या कार्यक्रमात चर्चा होणार होती. पण अचानक वीज गेल्याने मोठी गैरसोय झाली. राज्याचा बडा मंत्री गावात येतो आणि अचानक वीज जाते, त्यामुळे या घटनेची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं?

गडचिरोलीत मंत्री आले आणि वीज गेली अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कुरखेडा येथे आढावा सभा सुरू असतानाच बत्ती गुल झाली. कुरखेडा तालुक्यातील 132 केव्ही विजपुरवठा संदर्भात गंभीर चर्चा सुरू असताना वीज बेपत्ता झाली.

संतापलेल्या मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. दीर्घकाळ प्रतिक्षा करूनही वीज येत नसल्याने शेवटी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी कशीबशी सभा आटोपली. वीज पुरवठ्याच्या अभावी विजेसंदर्भातील चर्चा निष्फळ ठरलेल्यानंतर मंत्री अखेर कुरखेडा येथून रवाना झाले.

बत्ती गुल झाल्यामुळे मोठं नुकसान

वीजेचं अशाप्रकारे अचानक बेपत्ता होणं नुकसानकारक आहे. वीजेची बत्ती गुल झाल्याने रात्रीच्या वेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं. याशिवाय वीजेवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांचं नुकसान होतं. रुग्णालयांना फटका बसतो. याशिवाय रात्रीच्या वेली वीज गेल्याने सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होते. शेतकऱ्यांना शेतीच्या कामातही अडथळे येतात.