कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात (Chandgad Taluka) हत्तींचा वावर आता नवा राहिला नाही. काही दिवसांपूर्वी पाटणे, कलिवडे, किटवडे, हेरे, झांबरे, उमगाव, खळणकरवाडी, कोकरे या भागात वावरणारा टस्कर म्हणजेच हत्ती (Elephant) आज शुक्रवारी अडकुरजवळील घटप्रभा (Adakur Ghatpabha) नदीत डुंबताना पाहायला मिळाला. भरदिवसा हत्ती पाण्यात डूंबताना दिसल्याने अडकूर, आमरोळी परिसरातील नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी अडकुरजवळील घटप्रभा नदीत डूंबताना नागरिकांनी हत्तीला पाहण्यासाठी गर्दी केल्याने हत्तीने नदीतूनच पलिकडे जात केंचेवाडी गावात प्रवेश केला. केंचेवाडी गाात हत्ती घुसल्याने नागरिकांतून भीतीचे वातावरण पसरले होते.
अडकुरमध्ये आलेल्या हत्तीला त्याच्या ओळखीसाठी म्हणून वन्यविभागाने त्याला चाळोबा गणेश असे नाव दिले आहे. आजऱ्यातील जंगलात वावर असणाऱ्या या हत्तीने चंदगड तालुक्यातील अडकुरमध्ये प्रवेश केल्याने आणि तो नदीत बसला असल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
आजऱ्याचा चाळोबा गणेश चंदगडमध्ये… pic.twitter.com/Mn67EX0wSy
— Mahadev Parvti Ramchandra (@mahadevpr) March 25, 2022
भात कापणीच्या दिवसात कर्नाटकातून हत्ती चंदगड तालुक्यात प्रवेश करतात. त्यानंतर स्थलांतर करत ते आजरा, राधानगरी तालुक्यातही आढळून येतात मात्र आज दिवसढवळ्या अडकुरजवळील घटप्रभा नदीत हत्ती आढळून आल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे हत्ती बिथरुन केंचेवाडी गावात घुसला.
काही दिवसांपूर्वी जांबरे उमगाव भागात हा एकट टस्कर नागरिकांना दिसून येत होता. तर आता चंदगड-कोल्हापूर मार्गावरील अडकूर गावाजवळ हत्ती आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अडकूर, गणुचीवाडी, आमरोळी, केंचेवाडी, उत्साळी, विंझणे परिसरातील जंगलात आता हत्तीने पलायन केले.
चंदगड तालुक्यातील अडकूर हे बाजार भरणारे आणि नेहमी वर्दळीचे ठिकाण असणारे गाव आहे. या गावाजवळ असणाऱ्या घटप्रभा नदीत सकाळपासूनच हत्तीचा वावर होता.
घटप्रभा नदीपट्यातील शेती परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र आहे. त्यामुळे हत्ती येण्याआधी परिसराला रानटी डूक्कर आणि गव्यांपासून धोका होता. त्यातच आता हत्तीचे आगमन झाल्याने शेतात असणाऱ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे मत ओलॅम अॅग्रोचे फिल्ड ऑफिसर प्रशांत कांबळे यांनी सांगितले.
चंदगड परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांना अडकुरमध्ये टस्कर आल्याचे समजताच त्यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसोबत अडकूर येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी हत्तीला बघून ओरडणाऱ्या लोकांना शांत बसण्याचे आवाहन करत त्यांनी हत्तीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. अडकूरमधून केंचेवाडी गावात गेलेल्या हत्तीमुळे केंचेवाडी गावात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. केंचेवाडीतून हत्ती उत्साळीजवळील डोंगरात गेल्याचे वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांनी सांगितले.
वन्यविभागाचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चंदगड तालुका हा डोंगराळ भाग असल्याने जंगलातील अनेक प्राणी चाऱ्याच्या शोधासाठी आता गावाजवळ आहेत. त्यामुळे त्यांना आता माणसांशी एकरुप झाल्यासारखे आहेत. त्यांना आता मानवी वस्तींची सवय झाली आहे. कोणताही वन्यप्राणी जर गावामध्ये आला तर त्याला शांततेने वाट मोकळी करुन देणे हे माणसांचे कर्तव्य आहे. माणसांनी वन्यप्राण्यासमोर शांतता दाखवली तर वन्यप्राण्यांना त्यांच्या त्यांच्या वाटेचे त्यांना ज्ञान असते. त्यामुळे त्यांचा रस्ता मोकळा करुन दिला तर ते शांततेने जंगलात जाऊ शकतात असेही त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या