फलटण, जि. सातारा, विनायक डावरूंग, दि. 30 नोव्हेंबर 2023 | मुंबईत राणी सईबाई नाईक – निंबाळकर भोसले यांचा पुतळा उभारण्याची मागणी श्रीमंत निर्मलादेवी फाऊंडेशनच्या यांनी केली. त्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्र दिले आहे. यामुळे कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात लवकरच राणी सईबाई नाईक – निंबाळकर यांचा पुतळा उभारला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी व छत्रपती संभाजी राजेंच्या आई होत्या.
श्रीमंत सईबाईराजे या महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथम पत्नी आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री होत्या. धीरोदत्त राजमाता जिजाबाई यांच्या मायाछत्राखाली श्रीमंत सईबाईराजे यांचे व्यक्तिमत्व अधिकच प्रगल्भ झाल्याचे इतिहास नोंदीवरुन दिसून येते. स्वराज्याच्या उभारणीपासून ते स्वराज्याच्या अस्तिवावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अफजलखानच्या स्वारीपर्यंतच्या नेहमी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे धैर्याने उभ्या होत्या. सईबाई यांनी शेवटच्या श्वासपर्यंत राजधर्माचे पालन केले. त्याची इतिहासकारांनी दखल घेतली आहे.
श्रीमंत सईबाईराजे यांच्या जीवनकालाचे सामान्यजनांना दर्शन व्हावे, या उद्देशाने त्यांचा पुतळा मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात बसविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही आपल्यास्तरावर व्हावी, अशी आग्रहाची विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.