उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जबाबदारी मिळणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवासंपासून सुरू आहे. यावर आता फडणवीस यांनीच मोठा खुलासा केला आहे. ते टीव्ही 9 च्या सत्ता संमेलनमध्ये बोलत होते. मी नेहमीच सांगतो जेव्हा दिल्लीच्या पत्रकारांकडे काही बातम्या नसतात तेव्हा ते अशा बातम्या करतात, असं होत नाही. कोणतीही अशी ऑफर नाही. भाजपमध्ये व्यक्ती किंवा नेते निर्णय घेत नाहीत तर पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेते असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
मी नेहमीच सांगतो जेव्हा दिल्लीच्या पत्रकारांकडे काही बातम्या नसतात तेव्हा ते अशा बातम्या करतात. असं होत नाही, कोणतीही अशी ऑफर नाही. भाजपमध्ये व्यक्ती किंवा नेते निर्णय घेत नाहीत. पार्लमेंट्री बोर्ड असते तेच निर्णय घेतात. माझा पक्ष दिल्लीत जायला सांगेल तर मी दिल्लीत जाईल. मुंबईत राहायला सांगितलं तर मुंबईत राहील. माझ्या पक्षाने सांगितलं तुमचा उपयोग नाही घरी बसा तर घरी बसेल. माझ्या मनात हेच आहे, देवेंद्र फडणवीस हे आपल्या मनाने चालत नाहीत, पक्षाच्या मनाने चालतात. पार्टीने जेव्हा सांगितलं तेव्हा एका मिनिटात उपमुख्यमंत्री झालो. पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेलो पक्षाच्या आदेशानंतर मी उपमुख्यमंत्री झालो. मी काही राजपत्र घेऊन आलो नाही, ताम्रपत्र घेऊन आलो नाही. पक्षाने जे सांगितलं ते मी केलं. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महायुतीमध्ये निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला की आम्ही देखील लगेच घोषणा करू, आमच्याकडे चेहरा आहे. त्यांच्याकडे आहे का त्यांना विचारा. निवडणुकीनंतर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि आमचं पार्लमेंट्री बोर्ड बसून याबाबत निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.