मुंबई – राज्यसभा निवडणुकीत 10 मते जास्त मिळवणाऱ्या भाजपाने विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election result)नवा रेकॉर्ड केला आहे. विधान परिषदेच्या पहिल्या फेरीत भाजपाला 133 मते मिळाली आहे. म्हणजे भाजपा आणि अपक्षांच्या 113 संख्याबळाच्या व्यतिरिक्त भाजपाला (BJP) 20 जास्त मते मिळाली आहेत. स्वाभाविकपणे ही जास्तीची 20 मते भाजपाने महाविकास आघाडीकडून फोडली आहेत. आता पुढचे काही दिवस कुणाची मते फुटली, याचा विचार महाविकास आघाडीतल तिन्ही पक्षांना आणि सहयोगी पक्षांना करावा लागणार आहे. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ 106 आहे आणि त्यांना अपक्ष 7आमदारांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपाचे संख्याबळ 113होते, प्रत्यक्षात मात्र भाजपाला पहिल्या फेरीत 133 मते मिळाली आहेत. त्यातही उमा खापरे यांचे एक मत बाद झाले, म्हणजे भाजपाकडे 134 मते हती. देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadanvis) चमत्कारच म्हणायला हवा. भाजपाच्या उमेदवारांना पहिल्या फेरीत मिळालेली मते पुढली प्रमाणे
प्रवीण दरेकर- 29
राम शिंदे- 30
श्रीकांत भारतीय – 30
उमा खापरे – 27
प्रसाद लाड – 17
या सगळ्यांची एकत्र बेरीज केली तर ती 133 होते आहे. एक मत बाद झाल्याने याच अर्थ असा की भाजपाचे संख्याबळ या निवडणुकीत 21 ने वाढलेले दिसते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला, तर राष्ट्रवादीकडे एकूण उमेदवार 53 आहेत. त्यातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळालेला नाही, त्यामुळे ही संख्या 51झाली होती. चार अपक्षांचाही पाठिंबा राष्ट्रवादीला होता, एकूण हा आकडा 55 होता, प्रत्यक्षात मात्र एखनाथ खडसेंना 29आणि रामराजे निंबाळकरांना 28 मते मिळाली आहेत. म्हणजेच राष्ट्रवादीला 57 मते मिळाली आहेत. त्यात रामराजेंच्या कोट्यातलं एक मत बाद झालं, म्हणजे एकूण 58 मते राष्ट्रवादीला मिळालीत, तीन मते ही जास्त आहेत, ही मते भाजपाच्या मित्रांनी दिल्याचा दावा विजयी उमेदवार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ 55 आहे. शिवसेनेच्या सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना 26-26मते पडली. म्हणजेच 52मते मिळाली. शिवसेनेची तीन मते काँग्रेसला जाणार अशी चर्चा होती, मात्र प्रत्यक्षात ती काँग्रेसला गेलीत का, याबाबत साशंकता आहे. तसेच शिवसेनेसोबत असलेल्या 7 अपक्षांची मते कुणाला गेली याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येते आहे. एकूण शिवसेनेची 10मते गायब झाली असल्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे संख्याबळ 44आहे, प्रत्यक्षात पहिल्या फेरीत चंद्रकांत हंडोरेंना 22 तर भाई जगताप यांना 20 मते पडली आहेत. याचाच अर्थ त्यांना केवळ 42 मते पडली आहेत. म्हणजे काँग्रेसचीही पूर्ण मते काँग्रेसला पहिल्या फेरीत मिळालेली नाहीत. त्यामुळे त्या दोन्ही नेते निवडून येणे अवघड झाले. दुसऱ्या मतांच्या गणतीत अखेरीस भाई जगताप विजयी झाले आणि चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. सेनेकडून मिळणारी जास्तीची तीन मतेही मिळाली की नाही, याबाबत साशंकता आहे. काँग्रेसची दोन मते फुटली हे स्पष्ट आहे. तसेच शिवसेनेची मते खरंच काँग्रेसला गेली असल्यास, काँग्रेसची पाच मते फुटली असल्याची शक्यता आहे.
एमआयएमची दोन मते, सपाची दोन मते, बविआची तीन मते अशी सात मते वरच्या गणितात कुठेच दिसत नाहीत, ही मतेही भाजपाला गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत एकूणच भाजपाने महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला आहे.