नाशिकः कोरोना (Corona) महामारीच्या दुसऱ्या लाटेने नाशिककरांना दिलेला तडाखा उभ्या देशाने पाहिला. आता पुन्हा एकदा ओमिक्रॉन ( Omicron) विषाणूच्या आगमनाने प्रशासन हादरले आहे. येणाऱ्या काळातील संकट कमी व्हावे, यासाठी जोरदार तयारी केली जात असून, महापालिकेतर्फे 2200 ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत, तर परदेशातून आलेल्या 289 जणांचा शोध घेतला जात आहे.
3300 बेड तयार
कोरानाची तिसरी लाट आली तर तिचा मुकाबला करण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरात 3300 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास 250 खाटा वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150, ठक्कर डोम 325, संभाजी स्टेडियम येथे 280 खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 180 खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर 500 खाटा, मोरी कोविड सेंटर 200 खाटा, अंबर सेंटर 300 खाटा, सातपूर मायको रुग्णालय 50, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल 60 ऑक्सिजन खाटा आहेत.
ऑक्सिजनची चोख व्यवस्था
नाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. ऑक्सजिनसाठी लोकांनी रस्त्यावर अक्षरशः रांगा लावल्या होत्या. याचे भयावह चित्र मीडियातून पुढे आले होते. हे पाहता आता महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. दररोज 4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून 23 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी 246 मेट्रीक टन क्षमतेच्या 19 टाक्या आहेत. 130 मेट्रीक टन साठ्याचे 7271 ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत.
289 नागरिकांचा शोध
गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 289 जणांची यादी महापालिकेला दिली आहे. त्यातील 68 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पैकी 55 जण निगेटीव्ह आहेत आणि 13 जणांचे अहवाल अजून यायचे असल्याचे समजते.
नगरसेविका आली आफ्रिकेतून
नाशिक महापालिकेतील एक नगरसेविका दक्षिण आफ्रिकेतून आल्याने महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. ही नगरसेविका सहकुटुंब आफ्रिकेला गेली होती. या नगरसेविकेने आपण कोरोना चाचणी केली असून, ती निगेटीव्ह आली असल्याचे महापालिकेला कळवले आहे. मात्र, या नगरसेविकेसोबत कोण-कोण आफ्रिकेला गेले होते. त्याची कोरोना चाचणी आता महापालका करणार असल्याचे समजते.