मुंबई- एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर मंत्र्यांची खाते काढून घेण्याबरोबरच त्यांना घेरण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यांनी गेल्या महिनाभरात घेतलेल्या निर्णयांच्या सर्व फायली ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाने (CM Office)सुरु केल्याची माहिती आहे. लोकसत्ता वृत्तपत्रात एका वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. या फायलींचा अभ्यास करुन येत्या काही काळात मंत्र्यांवर कारवाईही होण्याची शक्यता आहे. बंडखोर मंत्र्यांना डच्चू देण्यात आला नसला तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी आता मंत्र्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. सर्व बाजूंनी बंडखोरांची कोंडी कशा करता येईल, यासाठी आता सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासबोत असलेल्या बंडखोर मंत्र्यांनी गेल्या महिनाभरात घेतलेले सर्वच निर्णय आता तपासले जाणार आहेत. या सर्व फायलीच मुख्यमंत्री कार्यालयाने मागवल्या आहेत. त्यातही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची फेरतपासणी करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम) या दोन खात्यांच्या सर्व फाईल्सही सीएमओ कार्यालयाने घेतल्या असल्याची माहिती आहे.
दादा भुसे, संदिपान भुमरे, उदय सामंत, गुलाबराव पाटील यांनीही मान्य केलेल्या फायली जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती
आहे. या मंत्र्यांना बंडखोरीची कल्पना होती, त्यामुळे त्यांनी काही वादग्रस्त निर्णय घेतले असल्याचीही शक्यता आहे. काही जणांवर विशेष सूट दिली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या फायलींचा अभ्यास करुन, काही कारवाई करण्यात येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
जनतेची कामे थांबू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळात फेरबल केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आली आहेत.
गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे देण्यात आले आहे.
दादा भुसे यांच्याकडील कृषी व माजी सैनिक कल्याण खाते आणि संदिपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आले आहे.उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.