मुंबईः जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुरब्बी राजकारणी शरद पवार भावनिक होणं, जुन्या आठवणीत रमणं दुर्मिळ असतं. ते समोरच्याला चित् करतात. राजकारणात अनेकांना कात्रजचा घाट दाखवतात. त्यांची खेळी भल्या-भल्यांना समजत नाही. त्यामुळंच पवार म्हटलं की, काहीही होऊ शकतं. हे त्यांच्या पावसात भिजलेल्या सभेनं दाखवून दिलं. तिथूनच पुढे उभ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे वारे फिरले. हेच आपल्याला माहित असतं. मात्र, आज हेच पवार क्षणिक भावुक अन् हळवे झालेले दिसले. यावेळी त्यांनी आपलं 12 डिसेंबरचं मायाळू नातं सांगितलं. अन् सारेच अवाक् झाले.
अन् विदर्भाने घेतला पुढाकार
शरद पवार म्हणाले, मी 50 वर्षांचा झालो तेव्हा विदर्भातील लोकांनी पुढाकार घेतला आणि माझा वाढदिवस झाला. 61 वर्षांचा झालो, तेव्हा भुजबळांनी पुढाकार घेऊन वाजपेयींच्या उपस्थित वाढदिवस झाला. 75 वर्षांचा झालो तेव्हा देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थित हा कार्यक्रम दिल्लीत झाल्याचं त्यांनी सागितलं. साधारणतः लक्षात घेतलं असेल 50, 61 आणि 75 या तीन वाढदिवसाला विशिष्ट प्रसंगानिमित्ताने वाढदिवस आयोजित केला होता. पण 81 आणि 82 ला कार्यक्रम आयोजित करणं मला पटलेलं नव्हतं. पण पक्षाचे आदेश आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला. तुम्ही सर्वांनी आयोजन केलं. मी तुमच्या सर्वांचा अंतकरणापासून आभारी आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात आणि देशात आणखी काम करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला प्रोत्साहन दिल्याचं ते म्हणाले.
आयुष्यातील महत्त्वाचा दिवस
पवार म्हणाले, 12 डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. माझा वाढदिवस आहे म्हणून नाही, तर 12 डिसेंबर हा माझ्या आईचा वाढदिवस आहे. गंमत अशी आहे माझ्या घरात 12 डिसेंबरचे तीन-चार वाढदिवस आहेत. जयंत, विभावरी, माझा एक पुतण्या, माझ्या बहिणीची मुलगी तिचा वाढदिवसही 12 डिसेंबर आहे. त्यात आई 12 डिसेंबरची. मी 12 डिसेंबरचा आणि पणतू 13 डिसेंबरचा. काही योग असतो, पण हे आहे ते खरं आहे, असे ते म्हणाले.
तो राष्ट्रवादीच…
पवार म्हणाले, काही गोष्टींच्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे. आपण एका विचाराने महाराष्ट्र आणि देशात काम करतो. पक्ष लहान असेल मर्यादित कार्यकर्ते असतील. पण बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे वैशिष्ट्ये आहे. आज असंख्य प्रश्न सामान्य लोकांसमोर आहेत. त्यामुळे प्रभावीपणे काम करणारा पक्ष कोणता, तर लोकांनी हा निष्कर्ष काढला पाहिजे की, तो राष्ट्रवादीच असू शकतो. त्यादृष्टीने पक्षाची बांधणी केली पाहिजे. लहान घटकांना सोबत घेतलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल