राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

| Updated on: Sep 16, 2024 | 9:07 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
आमदार संजय गायकवाड
Follow us on

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देणार”, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड राजकारण तापलं होतं. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर या प्रकरणात संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या अडचणी वाढू शकतात. संजय गायकवाड यांच्यावर भारतीय न्याय संहिता नुसार 192, 351 (२) , ३५२ (३), ३५२ ( ४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय गायकवाड यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. दरम्यान, संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसने ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला धडा शिकवण्याकरता गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.

‘मी माझ्या वक्तव्यावर ठाम’

“स्टेटमेंट मी केलं आहे. मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील? मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी आरक्षण संपवणाऱ्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर ठाम आहे. काँग्रेसने 70 कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्लानिंग केलं आहे. काँग्रेस पेक्षा मोठी आंदोलने आम्ही केली आहेत. आम्हाला देखील दहा-दहा हजार माणसं आणून आंदोलन करता येतील”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.

‘माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने…’

“माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकीन. तुम्ही फक्त रोडवर पाय ठेऊन दाखवा, तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे. मी खरे बोलण्याचा निषेध करतात तर करा. जनता तुम्हाला मत पेटीतून उत्तर देईल. जे वक्तव्य केले ते माझे वैयक्तिक मत आहे”, असं संजय गायकवाड म्हणाले.

“काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अनेक वेळा माझ्या बद्दल घाणेरड्या गोष्टी बोलल्या आहेत. मी काही बोललो नाही. आजी तुमच्या नेत्याला राहुल गांधीला आवर घाला, जो आरक्षण संपवण्याची भाषा करतो. पहिले आपल्या नेत्याला शिकवा, मग निषेध करा”, असं संजय गायकवाड म्हणाले.