विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपानं आघाडी घेत रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 99 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपच्या पहिल्या यादीनंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या गोटात देखील घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आता कोणत्याही क्षणी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी जे इच्छूक आहेत, त्यांनी अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवेगिरी बंगल्यावर गर्दी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते भरत गावित यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे. आपल्याला उमेदवारी मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले गावित
‘ मला खूप आनंद झाला आहे, आज पक्षाकडून नवापूर मतदार संघासाठी उमेदवारी मिळाली आहे. अजित पवार यांनी मला अनेक सूचना केल्या आहेत. २४ तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्याकरिता सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहेत. माझे वडील माणिकराव गावित हे केंद्रीय मंत्री होते. त्यांनी सलग 9 वेळा निवडणूक लढवली आहे. मी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे. त्यामुळे मला अजित पवार यांनी वेळोवेळी मदत केली आहे. काँग्रेस पक्षाचं आव्हान मला वाटत नाही, माझा जनसंपर्क मोठा आहे. आज अजित पवार यांनी अनेक विद्यमान आमदारांना एबी फॉर्म दिला आहे. संविधान वाचवण्यासाठी मी काम करत राहणार असं गावित यांनी म्हटलं आहे.
17 जणांना एबी फॉर्म
दरम्यान कोणत्याही क्षणी आता अजित पवार गटाकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली जण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडून आतापर्यंत 17 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. यामध्ये 1. संजय बनसोडे 2. चेतन तुपे 3. सुनील टिंगरे 4. दिलीप वळसे पाटील 5. दौलत दरोडा 6. राजेश पाटील 7. दत्तात्रय भरणे 8. आशुतोष काळे 9. हिरामण खोसकर 10. नरहरी झिरवळ 11. छगन भुजबळ 12. भरत गावित 13. बाबासाहेब पाटील 14. अतुल बेनके 15. नितीन पवार 16. इंद्रनील नाईक 17. बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा समावेश आहे.