संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 4 नोव्हेंबर 2023 : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना पुण्यातील एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मीरा बोरवणकर या कार्यक्रमाला जाणार होत्या. पण अचानक बोरवणकर यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं आहे. मीरा बोरवणकर यांच्या विमान तिकिटांसह निमंत्रण रद्द करण्यात आलं आहे. मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यांनी पुस्तकात केलेल्या टीकेवरुन चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता अजित पवार यांच्या दबावामुळे पुण्यातील कार्यक्रमाचाचं निमंत्रण रद्द करण्यात आलं, असा दावा माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलाय.
“माझ्या ‘मॅडम कमिश्नर’ पुस्तकाचा 25 नोव्हेंबरला चंदिगडमध्ये वाचनाचा कार्यक्रम होता. त्यानंतर मला 26 नोव्हेंबरला पुण्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. त्यांनी मला निमंत्रण दिल्यानंतर तीन-चार दिवसांनी फोन केला. आयोजकांनी कारण सांगताना त्या लेखिकेलाच पुढे केलं. आम्ही दोन-तीन दिवसांपासून विचार करत होतो की आपल्याला कसं सांगावं. आता आपल्याला हा कार्यक्रम घेता येणार नाही. कारण अजित दादा यांच्याशी संबंध जे सगळं प्रकरण झालंय. मला एकदम धक्का बसला. मला माहिती आहे की, काही ना काही असा प्रतिसाद असणार, कारण आपण राजकीय नेत्याबद्दल बोलले”, असं मीरा बोरवणकर यांनी सांगितलं.
“मी त्यांना एक लेखी मेसेज पाठवला की, ज्यांनी मला एअर तिकीट पाठवलं होतं, माझा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. तुम्ही एकदा क्लेरिफाय करताय का? त्यांनी मला चार-पाच तासांनी मला उत्तर दिलं की, तुमचं सेशन ओव्हरलॅपिंग, ते रद्द करण्यात आलं आहे. तुमचं विमान तिकीटही रद्द करण्यात आलंय. हा त्याचाच परिणाम असेल. अजित दादांना अधिकारी घाबरतातच, पण मीडिया सुद्धा घाबरते”, असं मीरा बोरवणकर म्हणाल्या.
मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्यात दंगल घडवण्याबाबतचं संभाषण झाल्याचा आरोप केलाय. याबाबतही त्यांनी आज गौप्यस्फोट केला. या प्रकरणात पोलिसांकडे कणखर पुरावा होता. पण सरकारने नंतर ती केस काढून घेतली, असा मोठा दावा मीरा बोरवणकर यांनी केला.
“दंगली घडवण्याचा आदेश दिला गेला होता का, ते मला सांगता येणार नाही. त्यादिवशी पुणे बंद होतं. मला स्पेशल ब्रांचने बोलवून सांगितलं होतं की, हे टेलिफोनवरील संभाषण ऐकून घ्या. नीलम ताई आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात चर्चा सुरु होती की, इकडे दगडफेक, बस पेटवणं आणखी हिंसाचाराच्या घटना कुठे करायच्या यावर चर्चा सुरु होती”, असं मीरा बोरवणकर यांनी सांगितलं.
“मी तिथे पोहोचण्याआधीच स्पेशल ब्रांचने सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा आदेश दिला होता. त्यांनी बंदोबस्त वाढवला होता. मला वाटलं की, लोकांना माहिती असतं, पुढारी दंगल घडवून आणतात. पण ही एकदम मस्त केस होती. टेक्निकल पुरावादेखील होता. म्हणून आम्ही एफआयआर दाखल केला. पण नंतर सरकारने गपचूप ती केस काढून घेतली”, असा दावा मीरा बोरवणकर यांनी केला.