नागपूर | 14 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणावरून दोन दिवसांपासून नागपूरच्या अधिवेशनात चर्चा सुरू आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशीच भूमिका सर्व पक्षांची दिसतेय. चोवीस डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. 17 डिसेंबरला जरांगेंनी समाजाची बैठकही बोलावली आहे. 24 डिसेंबर नंतर पर्यायी आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे. तर, इकडे मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. दुसरीकडे शरद पवार गटानं भुजबळांचा विधानसभेमध्ये समाचार घेतलाय. भुजबळांचे शब्द अंगार असून महाराष्ट्र अशांत करता का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय.
छगन भुजबळ यांनी भर विधानसभेत आपल्याला गोळ्या घातल्या जाऊ शकतात असे पोलिसांना इन पुट आल्याचा गौप्यस्फोट केला. त्याची जरांगे पाटलांनी तिखट शब्दात खिल्ली उडवली. त्याला कोण गोळी घालेल? कशाला कोण खराब करील हात स्वतःचे. इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मराठ्यांचं काही गुंतलं नाही अशी टीका जरांगे पाटील यांनी केलीय.
भुजबळांनी विधानसभेत मराठा समाजासाठी असलेल्या सारथी योजनेप्रमाणे समान निधी ओबीसींच्या ही योजनेला द्या अशी मागणी केली. त्यावरही निधी समान तर आरक्षण समान का नाही? असा प्रतिसवाल जरांगेंनी केलाय. तर, भुजबळांच्या याच भाषणावरून शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांनी भुजबळांना घेरलंय.
भुजबळांच्या शब्दात अंगार असून महाराष्ट्र अशांत करता का? असं आव्हाड म्हणाले. ही अशी काय जादू आहे की नेमकी इलेक्शनच्या वेळेस घेतल्यावर उलट्या यायला सुरूवात होतात जातीच्या. ते बोलताय की प्रगल्भ राजकीय नेते आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे. गेले अनेक वर्ष OBC चं नेतृत्व केलंय. त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो. पण, त्यांच्या शब्दातनं शब्दांचा अंगार बाहेर पडावा. ही अपेक्षा नाही आहे अशी टीका आव्हाड यांनी केलीय.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भुजबळ यांना घेरलंय. राज्याचे एक मंत्री सगळीकडे जात आहेत. त्यांची त्यांची भूमिका ते मांडताहेत. मी त्यांना काही म्हणणार नाही. पण ते स्वतः सरकारमध्ये असताना इथं बसले आहेत आणि म्हणतात ओबीसींच्यावर अन्याय होत आहे. मंत्री महोदयांनी भाषण केलं. भुजबळ साहेबांनी त्यांना काय पाहिजे? हे त्यांनी मंत्रिमंडळात मांडावं. त्यांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांना मान्य असेल तर सरकारचा ठराव करावा. हे अधिवेशन संपवा आम्हाला सांगावं. काही अडचण नाही. पण, महाराष्ट्रात जाऊन आता इथनं पुढं भाषणं कुणीच करू नये अशी माझी विनंती आहे, असे जयंत पाटील म्हणालेत.
विधानपरिषदेत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी जरांगेवर निशाणा साधला. मराठा समाजाच्या गर्दीवर स्वार होऊन जरांगे आव्हानाची भाषा करत असल्याची टीका त्यांनी केली. त्या टीकेवरून जरांगेनी दरेकरांवर मुंबई बँकेतल्या कथित घोटाळ्यावरून पलटवार केलाय. एकूणच आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एके काळी सोबत असणारे नेते एकमेकांवर टीका करू लागले आहेत हे मात्र निश्चित.