Eknath Shinde on CM post : राज्यात महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा सस्पेंस तयार झाला होता. त्यावर आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सस्पेंस संपवला आहे. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे. महायुतीला मजबुतीने उभी करायची आहे. उद्या आमची बैठक आहे. तिन्ही पक्षाची दिल्लीत बैठक होईल. अमित शाह यांच्यासोबत तिथे चर्चा होईल. त्यात इतर निर्णय होईल. असं शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘काल मोदी आणि शाह यांच्याशी फोनवर बोललो. सरकार बनवण्यात आमचा कोणताही अडथळा नाही. तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. आजही मी सांगितलं की वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य राहील. उद्या बैठकीत चर्चा होईल महायुतीच्या सरकारबाबत चर्चा होईल.’
आम्ही महायुतीचे लोकं आहोत. त्यांनी अडीच वर्ष मला पाठिंबा दिला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य. आमचं पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवाराला असेल असं ही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
‘सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचं होतं. ते मोदी आणि शाह यांनी पूर्ण केलं. ते माझ्या पाठी पहाडासारखे उभे राहिले. मी अडीच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. दिवस रात्र काम केलं. कॉमन मॅनचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं. लाडका भाऊ ही माझी ओळख झाली. ही ओळख सर्वात मोठी आहे.’ असं ही एकनाथ शिंदे म्हणाले.
‘दोन चार दिवसांपासून आम्ही नाराज असल्याची चर्चा आहे. पण आम्ही नाराज होणारे नाही. आम्ही घरात बसणारे नाही. आम्ही एकत्रपणे काम करू. आम्हाला मोठा विजय मिळाला आहे. आता महायुतीचं सरकार भक्कमपणे काम करणार आहे.’ असं शिंदे म्हणाले.